शिखर शिंगणापूर : माण तालुक्यातील दानवलेवाडी गावच्या यात्रेनिमित्त सुट्टीवर आलेल्या जवानाचा सिंगलफेज मोटारीचा शॉक लागून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. प्रशांत दिलीप कदम (वय 35) असे मृत जवानाचे नाव असून, सध्या ते फुलबारी आसाम याठिकाणी सैन्यदलात सेवेत होते.
माण तालुक्यातील दानवलेवाडी येथील जवान प्रशांत कदम हे 14 वर्षांपासून भारतीय सैन्यदलात सेवेत होते. ते सध्या 19 मराठा एन्फंट्री फुलबारी आसाम येथे हवालदार या पदावर सेवा बजावत होते. गावची यात्रा व कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रशांत कदम हे दि. 24 मार्च रोजी दानवलेवाडी या मूळ गावी आले होते. शुक्रवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास घराच्या टाकीत पाणी भरण्यासाठी त्यांनी विद्युत मोटार चालू केली. काही वेळाने पाण्याची पाईप निघाल्याने ते पाईप बसवण्यासाठी मोटारीजवळ गेले. यावेळी कदम यांना मोटारीचा तीव्र शॉक लागल्याने ते खाली कोसळले. पुढील उपचारासाठी त्यांना दहिवडी ग्रामीण रुग्णालयात हलवले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
जवान प्रशांत कदम यांच्यावर सायंकाळी उशिरा दानवलेवाडी याठिकाणी जिल्हा सैनिक कार्यालयातील अधिकारी, बेळगाव येथील मराठा एन्फंट्री सैन्य दलातील अधिकारी, माणच्या प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर, तहसीलदार विकास अहिर, सरपंच शारदा माने यांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनीही कदम कुटुंबीयांचे सांत्वन केले. जवान प्रशांत कदम यांच्या पश्चात पत्नी सुप्रिया, मुलगा श्लोक (वय 6), आई, वडील, भाऊ असा परिवार आहे. जवान प्रशांत कदम हे 1 मे रोजी सुट्टी संपवून पुन्हा सेवेसाठी जाणार होते. मात्र त्यापूर्वीच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने दानवलेवाडीसह परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.