कोरेगाव : राज्यातील महायुती सरकारच्या धोरणामुळे संपूर्ण देशाला जगविणारा पोशिंदा असलेला शेतकरी अडचणीत आला आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत, महिलांवर अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. या सरकारला या गोष्टी थांबवता येत नाहीत, त्यांना सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. सरकार बदलण्याची वेळ आली असून कर्तुत्ववान माणसांच्या हाती राज्य सरकार द्यायचे आहे. कोरेगावातील आमदार शशिकांत शिंदे यांच्यासारखी कर्तृत्ववान माणसे या निवडणुकीत विजयी करावीत, असे आवाहन खासदार शरद पवार यांनी केले.
कोरेगाव विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार शशिकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ रहिमतपूर रस्त्यावरील भंडारी मैदानावर शनिवारी सायंकाळी पाच वाजता खासदार शरद पवार यांची प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपसह सरकारवर आपल्या शैलीत टीका केली. व्यासपीठावर आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह माजी आमदार बाबुराव माने, आमदार अरुण लाड, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, माथाडी कामगार नेते गुलाबराव जगताप, काँग्रेसचे प्रदेश चिटणीस राजेंद्र शेलार यांच्यासह महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
खासदार शरद पवार यांनी शेतकरी आत्महत्या कशाने का होतात, यावरील उदाहरण दिले. राज्यातील भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार उरला नाही, त्यांनी सर्वसामान्य जनतेला विशेष करून महिलांना संरक्षण दिले नाही. अत्याचाराच्या घटना वाढल्या आहे संपूर्ण देशाचा पोशिंदा असलेला शेतकरी वर्ग शेतमालाला योग्य किंमत मिळत नसल्याने आत्महत्या करत आहे, हे महाराष्ट्राचे चित्र आता बदलण्याची गरज निर्माण झाली आहे. या सरकारला बदलायचे असेल तर कर्तृत्ववान माणसांच्या हाती राज्य देणे गरजेचे आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्यासारखे कर्तृत्ववान माणसे संपूर्ण महाराष्ट्रात महाविकास आघाडीच्यावतीने निवडणूक लढवत आहेत, त्यांना विजयी करून सामान्य जनतेने सत्ता परिवर्तनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावावी, असे आवाहन खा. शरद पवार यांनी केले.
खासदार शरद पवार यांनी मतदार संघातील दहशतीबाबत भाष्य केले. शशिकांत शिंदे हे कसे योग्य उमेदवार आहे, याबाबत माहिती दिली. अनेक वर्ष सर्वसामान्य जनता आणि माथाडी कामगार यांच्यासाठी ते अहोरात्र काम करत आहेत. एक दोन निवडणुकीत त्यांना यश आले नाही, लोकसभा निवडणुकीत सामान्य जनता त्यांच्या पाठीशी होती, मात्र निवडणूक चिन्हामुळे त्यांचा पराभव झाला, असे स्पष्ट करत शशिकांत शिंदे सर्वसामान्य जनतेसाठी लढण्यास तयार आहेत. त्यांना एका बाजूला प्रचंड पैसा, गुंडगिरी आणि दादागिरीला सामोरे जावे लागत आहे. ते त्यांच्याशी दोन हात करत असून सर्वसामान्य जनतेसाठी तेच योग्य उमेदवार आहेत, असेही खासदार शरद पवार यांनी नमूद केले.
आमदार शशिकांत शिंदे यांनी अत्यंत आक्रमकपणे भाषण करत कोरेगाव मतदारसंघात सुरू असलेल्या झुंडशाही आणि दबावाच्या राजकारणाचा पर्दाफाश केला. खासदार शरद पवार यांची उंची फार मोठी आहे, अशा माणसांवर काही लोक विशेष करून टीका करतात असे निदर्शनास आणून देत आ. शशिकांत शिंदे यांनी शरद पवार हे वादळ आहे, भल्याभल्यांना त्यांनी उडवून टाकले असल्याचे सांगितले.
सध्या पाण्याच्या नावाखाली मतदारसंघात राजकारण सुरू आहे. मते द्या नाही तर पाणी देणार नाही, असा स्पष्ट इशारा विरोधकांकडून जनतेला दिला जातो. महाराष्ट्रातील पाणी वाटपाचा समतोल या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमुळे ढासळला असून त्यांनी राज्यात पाण्यावरून संघर्ष वाढवला असल्याचा आरोप आ. शशिकांत शिंदे यांनी केला.
सर्वसामान्य जनतेवर दबाव टाकला जात आहे, अन्याय केला जात आहे. मात्र अनेक प्रमुख नेतेमंडळी प्रवाहाच्या विरोधात जाऊन सक्रीय झाली आहेत. स्वाभिमान हाच उद्देश ठेवून ते महाविकास आघाडीच्या प्रवाहात आले असून या निवडणुकीत निश्चित परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यशवंतराव चव्हाण आणि खासदार शरद पवार यांच्या विचारांचा सातारा जिल्हा असून हा बालेकिल्ला शाबित ठेवण्यासाठी मनापासून प्रामाणिक प्रयत्न केला. अनेक नेतेमंडळी सोडून गेली मात्र सर्वसामान्य जनता आणि कार्यकर्त्यांच्या बळावर अवघ्या वीस दिवसात लोकसभेची निवडणूक लढवली. साडेपाच लाखां होऊन अधिक लोकांनी मताद्वारे विश्वास व्यक्त केला. खासदार शरद पवार हे मोठे नेतृत्व आहे, अगदी काल-परवा माजी आमदार डॉक्टर शालिनीताई पाटील यांना भेटलो, त्यावेळी देखील त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. त्यांनी महाराष्ट्राला खासदार शरद पवार यांची गरज असल्याचे मत व्यक्त केले आहे. एकूणच महायुती सरकारने राज्यातील जनतेला वेठीस धरले असून लुटारूंचे राज्य आणले आहे. या सर्वांचा पाडाव करून आपल्याला मतदारसंघात परिवर्तन घडवायचे आहे. त्यासाठी जनतेने साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी माजी आमदार बाबुराव माने, राजेंद्र शेलार, सागरभाऊ साळुंखे, सचिन झांजुर्णे, प्रताप जानुगडे पाटील आणि अरुण जावळे यांची आक्रमक भाषणे झाली. महायुतीच्या कारभारावर त्यांनी टीका केली. कोरेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष राहुल साबळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
सभेस अभूतपूर्व गर्दी
कोरेगाव विधानसभा मतदारसंघावर महायुतीसह महाविकास आघाडीने चांगले लक्ष केंद्रित केले आहे. निवडणुकीच्या सुरुवातीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भंडारी मैदानावर जाहीर सभा घेतली होती, त्याच मैदानावर निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात खासदार शरद पवार यांची सभा झाली. प्रचंड जनसागर या सभेस उपस्थित होता. यासाठी भलामोठा मंडप उभारण्यात आला होता. त्याच्या लगत आणखी दोन मंडप उभारण्यात आले होते, तसेच रहिमतपूर रस्त्यापर्यंत लोक उभे राहून सभा ऐकत होते. एकूणच या सभेला मोठा जनसागर लोटला होता.