पाटण तालुक्यातील जळव घाटात भाविकांची पिकअप पलटी; हिवरे येथील महिला ठार तर 22 जण गंभीर जखमी

by Team Satara Today | published on : 24 March 2026


पाटण : पाटण तालुक्यातील जळव घाटात मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या पिकअप जीपला अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्यामुळे जीप रस्त्यानजीक डोंगराच्या कठड्याला धडकून उलटली. या अपघातात एक महिला ठार तर सुमारे 22 भाविक गंभीर तसेच किरकोळ जखमी झाले आहेत. वंदना विठ्ठल काकडे (वय 55, रा. हिवरे, ता. कोरेगाव) असे अपघातात ठार झालेल्या महिलेचे नाव आहे. 

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावातील 20 ते 22 भाविक पिकअप वाहनाने मंगळवारी सकाळी पाटण तालुक्यातील निवकणे येथे देवदर्शनाला निघाले होते. सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पिकअप घाटातील एका अवघड वळणावर आली असताना गाडीचे ब्रेक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याने गाडी डोंगराच्या बाजूला असलेल्या नाल्यात पलटी झाली.

अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला. गाडीत पाठीमागच्या हौद्यात बसलेले भाविक एकमेकांच्या अंगावर पडले. त्यामध्ये एक महिला गंभीर जखमी होऊन मृत झाली. अपघात निदर्शनास येताच परिसरातील ग्रामस्थांसह इतर प्रवाशांनी त्याठिकाणी धाव घेवून जखमींना अपघातग्रस्त वाहनातून बाहेर काढले. तारळेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल उपचारार्थ त्यांना केले. प्राथमिक उपचार करून जखमीना सातारा येथे जिल्हा शासकीय रूग्णालयात तसेच खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

सुलोचना किरण शिंदे (वय 45), पंढरीनाथ बबन काकडे (35), विठ्ठल दिनकर काकडे (55), लता राजेंद्र खरात (50), किरण किसन शिंदे (48), विद्या सोमनाथ काकडे (45), प्रभावती एकनाथ काकडे (75), शालन नानासो खाताळ (50), केशव ज्ञानबा जगदाळे (83), छाया गणेश खताळ (40), रुक्मिणी प्रल्हाद काकडे (62), आबाजी बापूराव खताळ (76), दाजीराम गणपती खताळ (80), सिंधू चंद्रकांत शिंदे (60), एकनाथ राजाराम काकडे (72), शकुंतला आबाजी खताळ (62), शंकर कोंडीबा खताळ (62), शांताबाई शंकर खताळ (62) व चालक बापू संभाजी खताळ (वय 36, सर्व रा. हिवरे) अशी जखमी झालेलयांची नावे  आहेत.

अपघातप्रकरणी सोमनाथ एकनाथ काकडे यांनी उंब्रज पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चालक बापू संभाजी खताळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक खबाले तपास करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराडामध्ये भरधाव व्हॅनने दोघांना उडवले; मद्यधुंद चालक पोलिसांच्या ताब्यात; जमावाकडून व्हॅनची तोडफोड
पुढील बातमी
साखर कारखान्यांच्या आर्थिक सहाय्यासाठी तातडीने राज्यस्तरीय समिती गठीत; समितीकडून तातडीने अहवाल घेण्यात येणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

संबंधित बातम्या