ठाकरेंच्या मेळाव्यासाठी दिग्गज मराठी कलाकारांची फौज

व्यक्त केला आनंद

by Team Satara Today | published on : 05 July 2025


संपूर्ण मुंबईकरांसह राज्यभरातील शिवसैनिक आणि मनसैनिक ज्या दिवसाची वाट पाहत होते, तो दिवस अखेर आज उजाडला. मुंबईतील वरळी डोममध्ये आज (५ जुलै) माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे एकत्र येणार आहेत. आजच्या विजयी मेळाव्यासाठी फक्त मुंबई आणि परिसरातूनच नाही तर, संपूर्ण महाराष्ट्रातून मराठी माणूस एकत्र आला आहे. या मेळाव्यामध्ये फक्त सामान्य माणूस नाही तर, मराठी इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज कलाकारही उपस्थित झाले आहे.

विजयी मेळाव्यासाठी मराठमोळा अभिनेता भरत जाधव, सिद्धार्थ जाधव, अभिनेत्री तेजस्विनी पंडीत आणि चिन्मयी सुमित या कलाकारांनीही उपस्थिती लावली आहे. या कलाकारांनी उपस्थिती लावल्यानंतर या सर्वच कलाकारांनीच माध्यमांसोबत संवाद साधला. भावना व्यक्त करताना अभिनेता भरत जाधवने सांगितलं की, “ही चुकीची गोष्ट आहे. आपल्याच राज्यात राहून आपण अपमानित होतोय, ही चुकीची गोष्ट आहे. प्रत्येकजण स्वत:चं मत व्यक्त करतोय. मराठी माणसाने जगायला हवं. मराठीपणा जपायला हवा. असं नाही की हिंदीच्या विरोधात आहे. पण हिंदी सक्तीची नसावी याच विरोधात आपण होतो.”

त्यानंतर अभिनेता सिद्धार्थ जाधवनेही प्रतिक्रिया दिली, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोन्हीही नेत्यांना एकत्र पाहणं ही गोष्ट आपल्याला खूप उत्सुक करणार आहे. हा अनुभव आणि ती एनर्जी छान आहे आणि तिच अनुभवण्यासाठी मी इथे आलोय. याच गोष्टीची वाट बघतोय मराठी माणूस. आज फक्त ऐकायचंय साहेबांना!” त्यानंतर तेजस्विनी पंडितने देखील प्रतिक्रिया दिली. ती म्हणाली की, “मराठी भाषेसाठीच आज आपण एकत्र आलेलो आहोत. मराठी भाषेचा जो विजय झालाय जी वज्रमूठ मराठी माणसाने दाखवलीय त्यासाठीच आपण एकत्र आलो आहोत. जी संपूर्ण महाराष्ट्राची भावना आहे त्यासाठीच आलेलो आहोत. अजून खूप मराठी माणसांनी जोडलं गेलं पाहिजे. अजून मराठी माणसाने एकत्र येणं बाकी आहे.”

माध्यमांसोबत बोलताना चिन्मयी सुमीत म्हणाली की, “एक लबाडी जी झालेली आहे, त्यामुळे हे आंदोलन कशापद्धतीने पुढे न्यायचं यासाठी हे एकत्र येणं आहे. राज ठाकरे- उद्धव ठाकरे हे दोन महत्वाचे नेते त्यासाठी काही करु इच्छितात ही अत्यंत चांगली गोष्ट आहे. त्यांनी जे जाहीर आवाहन केलंय, त्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. आम्हाला निमंत्रित केलं गेलं नाही. यानिमित्ताने मराठी लोक एकत्र आलेले आहेत, हा सहभाग खूप महत्वाचा आहे.” या चौघांनीही माध्यमांसोबत बोलताना ही आपली प्रतिक्रिया दिली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचे फोडले कार्यालय
पुढील बातमी
25 बॉल्समध्ये 9 विकेट्स

संबंधित बातम्या