सातारा : दहिवडी रस्त्यावर स्वामी समर्थ मंदिरानजीक झालेल्या तिहेरी भीषण अपघातात औंध येथील दोन जणांचा मृत्यू, तर सहा जण गंभीर जखमी झाले. या अपघाताची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी घटनास्थळी भेट दिली.
सोमवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास दहिवडी-वडूज रस्त्यावर असणार्या स्वामी समर्थ मंदिरा नजीक स्विफ्ट गाडी क्र. एमएच 03 डीए 7354 ही गाडी प्रसाद उर्फ बाबू राजेंद्र सुतार हा चालवत होता. यावेळी त्याच्यासोबत शिवम हनुमंत शिंदे हा देखील गाडीत होता. प्रसाद सुतार याने निष्काळजीपणाने, भरधाव वेगाने गाडी चालवून त्याच्या समोर असणार्या ओमनी क्रमांक एचएच 14 डीएन 2758 या गाडीस पाठीमागुन जोराची धडक दिली. त्यानंतर दहिवडीकडून वडूजकडे जाणार्या पीकप गाडी क्रमांक एचएच 11 सीएच 3342 ला समोरुन जोराची धडक देऊन मोठा भीषण अपघात केला. या अपघातात शिवम शिंदे आणि प्रसाद सुतार यांचा मृत्यू झाला, तर स्विफ्टमध्ये असणारे मनोज शंकर रणदिवे, सत्यम राजेंद्र खैरमोडे दोन्ही रा. औंध, तसेच पिकअप गाडीमधील लालासो परशुराम पाटोळे, ज्योती लालासो पाटोळे दोन्ही रा. दरुज, ओमनी गाडी मधील रोहन आप्पासाहेब भिसे व आकाश सोनबा बर्गे रा. वडुज हे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे यांनी स्टाफसह अपघात स्थळी भेट देऊन जखमींना अधिक उपचाराला सातारला पाठवले आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले.
या अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात झाली असून फिर्याद धनाजी आबाजी सुळे रा. पिंपळवाडी तालुका खटाव यांनी दिली आहे. या अपघातात मयत पावलेला शिवम शिंदे हा औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे यांचा मुलगा आहे, तर प्रसाद सुतार हा औंध शिक्षण मंडळाचे कर्मचारी राजेंद्र सुतार यांचा मुलगा असून दोघेही जिवलग मित्र होते. त्यांच्या अपघाती निधनाने औंध गावावर शोककळा पसरली असून ग्रामस्थांनी आजचा आठवडी बाजार रद्द केला.