सातारा : शासन सेवेत समायोजन करावे, बदली धोरण, वेतनवाढ, आरोग्य अन् अपघात विमा आदींसह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियानातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषदेसमोर लक्षवेध आंदोलन केले. यावेळी जोरदार घोषणाबाजीही करण्यात आली.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अधिकारी व कर्मचारी एकत्रीकरण समिती आणि एकता संघ यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच आरोग्य विभागालाही निवेदन देण्यात आलेले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या अंतर्गत १० वर्षे व त्यापेक्षा अधिक सेवा झालेल्या कर्मचाऱ्यांसाठी १४ मार्च २०२४ च्या शासन निर्णयानुसार शासन सेवेत समायोजन करण्यासाठी निर्णय झाला होता. पण, आता सव्वा वर्ष झाले तरीही शासनाच्या निर्णयाबाबत अंमलबजावणी झालेली नाही. आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, आरोग्य विभाग सचिव यांच्याकडेही कर्मचाऱ्यांनी विविध मागण्या आणि समायोजनसाठी बैठक घेण्याबाबत वेळोवेळी निवेदन दिले होते. तसेच भेटही घेण्यात आली होती. मात्र, १४ मार्च २०२४ चा शासन निर्णय आणि समायोजन तसेच इतर मागण्यांबाबत काहीही कार्यवाही झालेली नाही. त्यामुळेच लक्षवेध आंदोलन करण्यात येत आहे.
सातारा जिल्हा परिषदसमोरील आंदोलनात संघटनेचे राज्याध्यक्ष विजय गायकवाड यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रीय आरोग्य अभियानातील कर्मचारी सहभागी झाले होते.