मुंबई : महाराष्ट्रात खाद्य तेलाच्या विक्रीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठा निर्णय घेतला आहे. फडणवीसांच्या या निर्णयाने तेल व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. सरकारने २०११ च्या खाद्य सुरक्षा कायद्यातंर्गत सुटे तेल विक्री करण्यावरील बंदी १ वर्षासाठी स्थगित केली आहे. व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर सरकारने हा निर्णय घेतला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तेलाची गुणवत्ता आणि सुरक्षा अत्यंत गरजेची आहे. परंतु अनेक गरीब कुटुंबे असेही आहेत जे बाजारात सुटे तेल खरेदी करतात. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या मदतीने सरकार अन्न आणि औषध प्रशासनासोबत मिळून एक समिती तयार करेल. या समितीचे काम व्यापाऱ्यांना आवश्यक कार्यप्रणालीतील बदलांबाबत मार्गदर्शन करणे आणि गरज पडल्यास त्यांना मदत करणे हे असेल असं त्यांनी सांगितले.
मात्र व्यापाऱ्यांना दिलेली ही सवलत फक्त १ वर्षासाठीच असेल. एक वर्षानंतर ही मुदत संपेल आणि पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. सर्व व्यापाऱ्यांना सुरक्षेच्या नियमांचे पालन करावेच लागेल. या एका वर्षात प्रत्येक व्यापाराला व्यवसायात अनुकूल बदल करावे लागतील अशा स्पष्ट सूचनाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
दरम्यान, सुटे तेल विक्रीवरील बंदी उठावी यासाठी खाद्य तेल महासंघाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत मधला मार्ग काढण्यावर चर्चा झाली. बंदी उठवण्याची मागणी आम्ही केली होती. मुख्यमंत्र्यांनी १ वर्षाची मुदत दिली आहे. एक कमिटी बनवली जाईल ज्यात व्यापारी प्रतिनिधी व अधिकारी असणार आहेत. कोरोनानंतर लाकडी घाणे सुरू झालेत. काहींनी कर्ज घेत व्यवसाय सुरू केला. सुट्या तेलात भेसळ होते असा संभ्रम लोकांमध्ये आहे. मात्र व्यापारी भेसळ करत नाहीत. देशात कुठेही सुटे तेलावर बंदी नाही असं खाद्य तेल महासंघाचे अध्यक्ष शंकर ठक्कर यांनी बैठकीनंतर म्हटलं.
सुटे तेल विकायला १ वर्षाची मुदतवाढ; तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला मुख्यमंत्री फडणवीसांची स्थगिती, व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळासोबत बैठकीनंतर निर्णय
by Team Satara Today | published on : 01 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा