सातारा : विश्वासाने सोपविलेल्या कामाच्या ठिकाणीच हात साफ करण्याचा प्रकार अजंठा चौकातील पार्सल कार्यालयात उघडकीस आला आहे. सॅमसंग कंपनीचे २० नवे मोबाईल असलेला बॉक्स लंपास करणाऱ्या कार्यालयातील दोन कर्मचाऱ्यांचा डाव सातारा शहर पोलिसांनी उधळून लावला. सीसीटीव्ही फुटेजमधील संशयास्पद हालचालींच्या आधारे पोलिसांनी अवघ्या आठ तासांत दोघांना अटक केली. त्यांच्याकडून मोबाईलसह गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा आठ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सुमित प्रकाश मस्के (वय ३२, रा. मस्के कॉलनी, गोडोली) आणि विठ्ठल मारुती चव्हाण (वय ३०, रा. राजापूर, ता. सातारा, सध्या व्यंकटपुरा, मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.
१४ नोव्हेंबर रोजी अजंठा चौकातील पार्सल कार्यालयातून सॅमसंग कंपनीच्या २० नवीन मोबाईलचा बॉक्स गायब झाल्याचे निदर्शनास आले. कार्यालयाच्या मालकाने याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. लाखोंच्या मोबाईलची चोरी झाल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
तपासादरम्यान पोलिसांनी प्रथम कार्यालयातील सीसीटीव्ही यंत्रणेची पाहणी केली. चोरीच्या कालावधीत काही वेळ कॅमेरे बंद असल्याचे आढळले. परिसरातील इतर कॅमेऱ्यांचीही तपासणी करण्यात आली. मात्र, तेथून ठोस धागा मिळाला नाही. अखेर कार्यालयातील उपलब्ध फुटेजचे बारकाईने विश्लेषण करताना दोन कर्मचाऱ्यांच्या हालचाली पोलिसांच्या नजरेस आल्या. त्यानंतर तपासाची दिशा स्पष्ट झाली.
पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली. मात्र, सखोल चौकशीत मोबाईलचा बॉक्स चोरल्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर चोरीस गेलेले सर्व २० मोबाईल आणि गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल हस्तगत करण्यात आली.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली डी.बी. पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर मोरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी ही कारवाई केली.
पार्सल कार्यालयातीलच कर्मचाऱ्यांनी घातला लाखोंचा डल्ला; सीसीटीव्हीतील हालचालींनी फुटले बिंग
२० महागडे मोबाईल गायब करून पोलिसांना दिले आव्हान; आठ तासांत दोघे जेरबंद
by Team Satara Today | published on : 17 November 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा