सातारा : भारत निवडणूक आयोगाचे दि.२६ सप्टेंबर २०२६ च्या पत्रान्वये, मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी प्रक्रियेत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. सातारा जिल्हयात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी मोहिमेअंतर्गत (एसआयआर) ज्या मतदारांच्या नोंदणी मध्ये त्रुटी आढळल्या आहेत अशा मतदारांना सबंधित त्रुटी दूर करण्यासाठी ३ व ४ऑक्टोंबर येत्या शनिवार- रविवारी रोजी मतदान केंद्रात सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. तर १८ वर्षे पूर्ण झालेल्या नवमतदारांसाठी महाविद्यालयातच मतदार नोंदणी मोहिम राबविण्यात येणार आहे.
जिल्हयात सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल तपासणी प्रक्रियेत दावे व हरकती दाखल करण्याची मुदत १२ ऑक्टोबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. तर प्राप्त नोटिसा, दावे व हरकती निकाली काढण्यासाठी १० नोव्हेंबर पर्यंतची मुदत देण्यात आली असून, राज्याची अंतिम मतदार यादी १६ नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.
या मोहिमेत जुळणी न झालेले मतदार किंवा तार्किक विसंगती आढळून आलेल्या जिल्हयातील एकूण १,९०,०९६ इतक्या मतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. मात्र त्रुटींची पूर्तता करण्यासाठी मतदारांना आता मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे जाण्याची आवश्यकता नसून नोटीस आणि त्याचे उत्तर Whatsapp वर पाठविण्याची मुभा देण्यात आली आहे. प्रारुप मतदार यादी प्रसिध्द झालेनंतर २३३४५ मतदारांनी गेल्या महिनाभरात नव्याने अर्ज दाखल केले असून यामध्ये नवमतदारांचाही समावेश आहे. नव्याने मतदार नोंदणीसाठी नागरिकांकडून मिळणारा अल्प प्रतिसाद लक्षात घेऊन सातारा जिल्हयातील मतदारांसाठी येत्या शनिवार- रविवारी जिल्हयातील ३१६६ मतदान केंद्रावर विशेष शिबिर आयोजित करण्यात आली आहेत. या ठिकाणी मतदारांना मतदार यादीतील आपले नांव, पत्ता यात सुधारणा करण्यासाठीचे अर्जही दाखल करता येतील. तसेच नवमतदार नोंदणीसाठी सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये शिबिर आयोजित करण्याचे आणि या शिबिराच्या माध्यमातून किती विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंद झाल्याचा तपशील सादर करण्याचे सूचना देण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी दिली आहे.
तरी, सर्व पात्र नवयुवक व विदयार्थी यांनी जास्तीत जास्त संख्येने फॉर्म नं- ६ भरुन देऊन मतदार यादीत नाव नोंदणी करावी व लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग निश्चित करावा, असेही आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
जिल्हयात मतदार याद्यांमध्ये नावे समाविष्ट करण्यासाठी येत्या शनिवार, रविवारी विशेष मोहिम - जिल्हाधिकारी संतोष पाटील
by Team Satara Today | published on : 30 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा