सातारा : ...माझ्या गोव्याच्या भूमीतगड्या नारळ मधाचे--- कड्या-कपाऱ्यां मधुन घट फ़ुटती दुधाचे, --निळ्या खाडीच्या काठाला माझा हिरवाच गाव, जगात मी मिरवितो त्याचे लावूनिया नाव ...अशा गोव्याच्या सुंदर निसर्गातील भावबंध जपणाऱ्या बा.भ.बोरकर यांच्या सुंदर कविता.. येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय असलेल्या छत्रपती शिवाजी कॉलेजमधील विद्यार्थिनीच्या वसतिगृहात गोव्यातील विद्यार्थिनीनी सादर केल्या. लाल माती, निळे पाणी ,दाट माडांची झाडे, आंबे फणस यांचा सुवास, फळा फुलांचे पाझर, खारा वारा, पावसात सोन्या चांदीच्या पडणाऱ्या धारा, साळीचा भात, नागमोडी वळणाच्या पाय वाटा ...असे सारे काही बहारीने सादर केले. तसेच गोव्याच्या ग्रामजीवनात असलेल्या स्त्रियांच्या ‘धालो’ या लोकनृत्य प्रकाराचे साक्षात दर्शन घडवले. गोमंतकीय संस्कृतीतील ही विविधता पाहून वसतिगृहातील विद्यार्थिनीनी एक वेगळाच अनुभव घेतला जो त्यांना सातारा परिसरात कधीही पहायला मिळालाच नव्हता. निमित्त होते भाषा विभागाने ८ फेब्रुवारी २०२५ रोजी घेतलेल्या ‘जागतिक भाषा साहित्यातील प्रतिबिंबित वंचित, शोषित यांचे जीवन‘ या अंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे.
मागील शैक्षणिक वर्षात १ एप्रिल २०२४ मध्ये छत्रपती शिवाजी कॉलेज व सरकारी महाविद्यालय सांखळी गोवा या दोन्ही कॉलेजमधील मराठी विभागांचा सामंजस्य करार झाला. त्यावेळी महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य मेंडीस व मराठी विभाग प्रमुख डॉ.स्नेहा महांबरे आणि छत्रपती शिवाजी कॉलेजचे प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे व मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे यांनी दोन राज्ये आणि संस्कृती जोडणारा सामंजस्य करार केला. ज्ञानाची देवाण -घेवाण करण्याच्या उद्देशाने गोवा येथील सरकारी महाविद्यालय,सांखळी गोवा येथील १३ विद्यार्थी व २ प्राध्यापक उपस्थित राहिले. आणि ७ फेब्रुवारीला सायंकाळी छत्रपती शिवाजी कोलेजच्या विद्यार्थिनी वसतिगृहात जो सांस्कृतिक कार्यक्रम झाला त्यात सरकारी महाविद्यालय ,सांखळी गोवा या महाविद्यालयातील विद्यार्थिनीनी गोव्याच्या संस्कृतीचे साक्षात दर्शन नृत्य ,नाट्य,संवाद गायन,कविता वाचन यातून घडविले आणि साक्षात गोमंतकीय संस्कृती अवतरली.
सरकारी महाविद्यालय सांखळी गोवा येथील प्राचार्य प्रोफेसर डॉ.नामदेव गावस व मराठी विभाग प्रमुख डॉ.स्नेहा महांबरे यांच्या मार्गदर्शनाने ६ तारखेस मध्यरात्री तेथील कॉलेजचे मराठी विभागातील विद्यार्थी सातारयाकडे निघाले आणि ७ फेब्रुवारीस सकाळी ८ ला साताऱ्यात पोचले. छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये मराठी विभाग प्रमुख प्रा.डॉ.सुभाष वाघमारे व त्यांचे सहकारी यांनी त्यांचे आपुलकीने स्वागत केले. या दिवशी त्यांनी छत्रपती शिवाजी संग्रहालय व बारा मोटेची विहीर येथे भेट दिली. दुपारी सज्जनगड येथे भेट दिली. सायंकाळी प्रवासाचा शीण बाजूला ठेवून गोवा संस्कृतीतील अनेक लोककला प्रकार सादर केले.विशेषतःपारंपरिक गाऱ्हाणे, लोकगीते,गवळण, धालो इत्यादींतून संस्कृती उभी केली. कु. साजू गावस हिने घातलेल्या गोमंतकातील पारंपारिक गाऱ्हाण्याने सुरुवात झाली. कु. दिशा परवार हिने शिमगोत्सवातील लोकगीत सादर केले. ‘शबय शबय, वत्सय वत्सय’ या गीतांतील शब्दांनी जणू एक चैतन्य निर्माण केलं. या कोलेजच्या प्रा.सुशां होण्डकर यांचे अभ्यासपूर्ण माहितीवर आधारलेले चित्रमयी आस्वाद्य निवेदनाने गोव्यातील संस्कृतीची सूक्ष्म माहिती मिळत होती. गोमंतकातील महत्त्वाचा लोककला प्रकार म्हणजे धालो. पौष महिन्यात साजरा होणारा निसर्ग देवतेला वाहिलेला हा स्त्रियांचा उत्सव. गोव्यात धालो ५ किंवा ७ रात्री खेळला जातो. पहिल्या रात्री मांडावर तुळशी वृंदावनची पूजा, देवदेवतांना आमंत्रित करत धालोची सुरूवात करतात. गाऱ्हाणे, फाती, लग्नसोहळा, पिंगळी, सावज, मांड शिंपडणे अशा अनेक विधींचे विद्यार्थ्यांनी लोकगीतासह सादरीकरण केले. कु. दिया चोर्लेकर, दीक्षा गावस, साजू गावस, गीता झोरे, रुपाली राणे, दिशा परवार, रिया उसपकर,खुशिया लोहार,साक्षी गावस, अदिती गर्दे या विद्यार्थिनी यात सहभागी झाल्या. मराठीतील व गोमंतकातील प्रतिभावंत कवी बा.भ. बोरकर यांच्या गोव्याची भूमी व निसर्गाविषयीचे प्रेम व्यक्त करणाऱ्या 'माझ्या गोव्याच्या भूमीत', आणि 'निळ्या खाडीच्या काठाला' या कवितांचे सादरीकरण कु.अदिती गर्दे,दिया चोर्लेकर रिया उसपकर यांनी केले. कु. शर्वाणी म्हैसकर हिने गोमंतकातील प्रसिद्ध कवी मनोहरराय सरदेसाई यांची 'तू नासून' ही कविता सादर केली. कु. सानिका बर्वे हिने गोमंतकीय कवी दामोदर कारे यांची 'झुळूक' ही कविता सादर केली. कु. सिद्धेश झोरे याने गवळण गायली. दिशा परवार हिने गोमंतकातील लोकप्रिय कोकणी गीत 'साद तुगेलो आयकूक आयलो' सादर केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रा. सुशा होंडकर यांनी गोमंतकीय लोकसंस्कृतीचा परिचय करून दिला. वेशभूषा ,केशभूशेसह गीतगायन ,नाट्य,संवाद,विनोद, यामुळे प्रेक्षक असलेल्या मुलीना त्यांनी खिळवून ठेवले. छत्रपती शिवाजी कॉलेजच्या यशेंद्र क्षीरसागर यांनी ‘अग मैना हे मराठी लोकगीत, शोधिशी मानवा हे भावगीत सादर केले,तर प्रा,डॉ.सुभाष वाघमारे यांनी कॉलेज जीवनात चित्रपटातील गाण्यामुळे गाणी व कविता लिहायची आवड कशी झाली ते सांगून गाणे अश्विनी ये ना, आणि चल चल सजणे सिनेमाला, येग येग साताऱ्याला ही गीते सादर केली .तर समीक्षा चव्हाण हिने शेतकरी कविता सादर केली. दीड तास चाललेल्या या कार्यक्रमात सर्वजण रंगून गेले.प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी गोव्यातील सर्व विद्यार्थी व प्राध्यापक यांचा सत्कार केला. मराठी विभागाची विद्यार्थिनी प्रियांका मगरे व तिचे पती यांनी केलेल्या पुरोगामी कृतीबद्दल त्यांचा सत्कार प्राचार्य डॉ.राजेंद्र मोरे यांनी केला. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोव्यातील प्रा. सुशां होण्डकर,प्रा.अजित गावस विभागातील प्रा.डॉ.संजयकुमार सरगडे, प्रा.श्रीकांत भोकरे, प्रा.प्रियांका कुंभार. डॉ.विद्या नावडकर यांचेसह विद्यार्थी प्रथमेश बाबर, समीक्षा चव्हाण, जान्हवी चव्हाण,कार्यालयातील हणमंत ढेकळे या विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी छत्रपती शिवाजी कॉलेजच्या विद्यार्थिनी वसतीगृहाच्या रेक्टर जुई ढवळे व प्रा. महादेव चिंदे यांचे सहकार्य लाभले. प्रा.डॉ. सुभाष वाघमारे म्हणाले की राणी चन्नमा विद्यापीठ बेळगाव मराठी विभाग व सरकारी कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय गोवा यांचेशी सामंजस्य करार झाल्याने परराज्यात जिव्हाळ्याचे सबंध जपले जात आहेत. भाषा,साहित्य,व्यवहार ज्ञान,-संस्कृती ,कला,अशी देवाण-घेवाण केली जात आहे. मराठी विषयाच्या विद्यार्थ्यांनी संवेदनशील व बहुश्रुत होऊन निष्ठेने व जाणीवेने ज्ञान विस्तार करून घेण्याची गरज आहे. या पुढच्या काळात आंतरदेशीय संबंध स्थापित करण्यासाठी मराठी विभाग प्रयत्न करेल असे त्यांनी सांगितले. गोवा, कर्नाटक कोकण प्रांताशी स्नेहसबंध प्रस्थापित झाल्याने मराठी विभागाला चांगले सहकार्य मिळत असल्याबद्दल गोवा, बेळगाव येथील मराठी विभागातील सर्व प्राध्यापक यांचेबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.