वेतन करारावरून खासदार उदयनराजे भोसले यांच्या जिल्हा बँकेला इशारा

कर्मचाऱ्यांना पगारवाढ देण्याची केली मागणी

सातारा : नाबार्डच्या वतीने सहावेळा गौरवण्यात आलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांची पगारवाढ गेल्या 11 महिन्यापासून रखडली आहे. फिनॅकल सॉफ्टवेअर तंत्रप्रणाली अद्ययावत न झाल्याने हा करार रखडला आहे. या करारावरून खासदार उदयनराजे भोसले यांनी जिल्हा बँक व्यवस्थापनाचे कान टोचले आहेत. वेतन करारनामे अद्यावत करा, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

जलमंदिर येथून प्रसिद्ध झालेल्या पत्रकात नमूद आहे की, सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे. बँकेच्या यशस्वी वाटचालीत कर्मचाऱ्यांचे मोठे योगदान आहे. बँक कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत संबंधित करारनाम्याची मुदत 31 मार्च 2024 रोजी संपली आहे. बँकेच्या अमृत महोत्सवी वर्षात कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत करार न होणे ही बँकेच्या परंपरेला साजेशी बाब नाही. फिनॅकल सॉफ्टवेअर मध्ये केलेला बदल व त्या बदलामुळे नव्याने करावयास लागलेली प्रिंटरची खरेदी अन्य काही बाबींवर होणारा अनावश्यक खर्च आर्थिक बोजा वाढवणार आहे असे कधी का वाटले नाही हा खरा प्रश्न आहे. बँकेने अमृत महोत्सवी वर्षात भव्य दिव्य कार्यक्रमावर मोठ्या प्रमाणावर खर्च केला आहे. फिनॅकल सॉफ्टवेअरमुळे ग्राहक शेतकरी सभासद तसेच बँक कर्मचारी यांच्या मोठ्या प्रमाणात तक्रारी येत आहेत. त्याचा तातडीने विचार होणे गरजेचे आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा वेतन स्लॅब आणि वेतनवृद्धीसह दिला जावा त्यासाठी जरूर तो करारनामा पूर्वीच होणे अपेक्षित होते. कर्मचाऱ्यांना वेतन लाभापासून वंचित ठेवणे कोणत्याही सन्माननीय संचालकाला मान्य होणार नाही. आर्थिक बोजाचे कोणतेही थोतांड न करता त्यापेक्षा जिथे काटकसर करता येईल तिथे करावी आणि कर्मचाऱ्यांना दिलासा द्यावा. तसेच वेतन वाढीचे लाभही कर्मचाऱ्यांना मिळावेत, ही अपेक्षा आहे. करारनाम्यांचे तातडीने नूतनीकरण करावे. कर्मचाऱ्यांचा सेवा त्या बँकेच्या वाटचालीतील सहभाग लक्षात घ्यावा. सॉफ्टवेअरच्या बाबतीत होणाऱ्या तक्रारीचे योग्य निराकरण करावे. अन्यथा आम्हाला वेगळा पवित्रा घ्यावा लागेल आणि त्याला सर्वस्वी बँकेचे व्यवस्थापन जबाबदार राहील, असा इशारा खासदार उदयनराजे भोसले यांनी दिला आहे.



मागील बातमी
माहुलीच्या महिला सरपंचांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन
पुढील बातमी
जिल्हा रुग्णालयातील गैरसुविधांची जिल्हा प्रशासनाकडे तक्रार

संबंधित बातम्या