सातारा : आंतरराष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून तरुणाईमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्यासोबतच अवयवदान आणि गंभीर आजारांच्या प्रतिबंधाबाबत जनजागृती करण्यासाठी क्रांतिसिंह नाना पाटील शासकीय रुग्णालयाच्या वतीने बुधवारी शहरात जनजागृती रॅली काढण्यात आली. वैद्यकीय विद्यार्थी, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि नागरिकांच्या सहभागामुळे रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
शासकीय रुग्णालयाच्या परिसरातून सुरू झालेली रॅली राजवाडा परिसरात पोहोचली. विविध घोषवाक्ये आणि फलकांच्या माध्यमातून आरोग्याची काळजी घेणे, अवयवदानाचे महत्त्व, गंभीर आजारांपासून बचाव तसेच निरोगी जीवनशैलीचा स्वीकार करण्याचा संदेश देण्यात आला. युवकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतानाच समाजाच्या आरोग्याबाबतही सकारात्मक भूमिका बजावावी, यासाठी रॅलीच्या माध्यमातून आवाहन करण्यात आले.
जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश पी. ए. वाघमारे आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल जाधव यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अतुल लिपारे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अविनाश पाटील, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य डॉ. स्मिता लोंढे, अधिसेविका अनिता कालसेकर यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते.
दरम्यान, आरोग्यविषयक निबंध स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी करणार्या विजेत्या विद्यार्थिनींचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. युवा पिढीला आरोग्यदूताची भूमिका बजावण्यासाठी प्रेरित करणारा हा उपक्रम सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरला.