कराड : बंदी असलेल्या प्लॅस्टिक पिशव्या तयार करणाऱ्या तासवडे औद्योगिक वसाहतीतील कंपनीवर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने आज छापा टाकला. तेथून सुमारे चार टन प्लॅस्टिक जप्त केले. तेथील एका कंपनीत पत्रावळी, द्रोण आणि प्लॅस्टिकचे ग्लास तयार करताना छापा टाकण्यात आला. संबंधितांकडून सुमारे ४० हजार पत्रावळी, सुमारे दहा हजार द्रोण आणि ७० बॉक्स प्लॅस्टिकचे ग्लास आणि प्लॅस्टिक स्ट्रॉ जप्त केल्या. संबंधितांना प्रत्येकी पाच हजार दंडही केल्याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी अमोल सातपुते, क्षेत्र अधिकारी अर्चना जगदाळे यांनी दिली.
उपप्रादेशिक अधिकारी सातपुते म्हणाले, शासनाने कमी जाडीच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या वापरावर बंदी घातली आहे. बंदी असतानाही प्लॅस्टिकच्या पिशव्या तयार केल्या जात असल्याची माहिती कार्यालयाला मिळाली. त्यानुसार तासवडे औद्योगिक वसाहतीतील एका कंपनीवर छापा टाकला. तेथे बंदी असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्यांचे उत्पादन करण्यात आल्याचे दिसून आले. संबंधित ठिकाणावरून सुमारे चार टन प्लॅस्टिकच्या पिशव्या जप्त केल्या.
तेथीलच एका कंपनीत प्लॅस्टिकचे द्रोण, ग्लास, पत्रावळी, स्ट्रॉ तयार करण्यात येत असल्याची माहिती मिळाली. संबंधित कंपनीवरही छापा टाकून तेथून सुमारे ४० हजार पत्रावळी, सुमारे दहा हजार द्रोण आणि ७० बॉक्स प्लॅस्टिकचे ग्लास आणि प्लॅस्टिकच्या स्ट्रॉ जप्त केल्या आहेत. दोन्ही कंपन्यांच्या मालकांना प्रत्येकी पाच हजार दंडही केला आहे. संबंधितावर पुढील कारवाईचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला आहे. जप्त केलेला मुद्देमालाची विल्हेवाट लावण्यासाठी तो माल तळबीड ग्रामपंचायतीकडे पाठवण्यात आला आहे.