सातारा जिल्हा बँक निवडणूक : छाननीत १२ उमेदवारांचे अर्ज बाद; सुरभी भोसले, प्रकाश बडेकरांना दिलासा

महायुतीतील परस्पर आक्षेपांमुळे छाननीत कायदेशीर काथ्याकूट; अंतिम चित्र माघारीनंतरच स्पष्ट होणार

by Team Satara Today | published on : 06 October 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी दाखल अर्जांच्या छाननीत १२ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून सुरभी भोसले आणि प्रकाश बडेकर यांचे अन्य मतदारसंघांतील अर्ज वैध ठरल्याने त्यांचा निवडणुकीचा मार्ग मोकळा राहिला आहे.
​जिल्हा बँक निवडणुकीसाठी दाखल अर्जांची मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर छाननी पार पडली. महायुतीतील घटक पक्षांमधील चुरस या प्रक्रियेतही स्पष्टपणे पाहायला मिळाली. उमेदवारांच्या वतीने एकमेकांच्या अर्जांवर जोरदार आक्षेप घेण्यात आल्याने पात्रता, आवश्यक कागदपत्रे आणि निवडणूक नियमांवरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर दीर्घकाळ कायदेशीर काथ्याकूट झाला. दोन्ही बाजूंच्या प्रतिनिधींनी आवश्यक कागदपत्रे आणि कायदेशीर मुद्दे मांडल्यानंतर अखेर १२ उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले.
​या छाननीदरम्यान सुरभी भोसले यांच्या अर्जावर सूचक नसल्याचा आक्षेप घेण्यात आला, तर प्रकाश ज्ञानू बडेकर यांच्या अर्जातील सूचक व अनुमोदक अन्य मतदारसंघातील असल्याने त्यांचे अर्ज अवैध ठरले. मात्र, या दोघांनीही इतर मतदारसंघांतून दाखल केलेले अर्ज वैध ठरल्याने त्यांच्यासाठी निवडणुकीचा पर्याय खुला राहिला आहे.
​कागदपत्रांमधील त्रुटी आणि थकबाकीच्या कारणांमुळे इतर उमेदवारांचे अर्ज बाद झाले. यामध्ये इतर मागास जातीचा दाखला न जोडल्याने बाळकृष्ण किसन माळी (दिवड), महिला प्रतिनिधी मतदारसंघासाठी समिती सदस्यांची यादी न दिल्याने दिपाली यशवंत साळुंखे (भादे) आणि थकबाकीदार असल्याने सचिन तुकाराम माळी यांचा अर्ज बाद झाला. विमुक्त भटक्या जाती मतदारसंघासाठी आवश्यक संचालक मंडळाची यादी न जोडल्याने लवराज गणपती जाधव (मसूर) व सोनगावचे भीमदेव बाबा बुरुंगले, तसेच थकबाकीमुळे वडगाव हवेली विकास संस्थेचे जगदीश दिनकरराव जगताप यांचे अर्ज अवैध ठरविण्यात आले. अनुसूचित जाती मतदारसंघासाठी संचालक मंडळाची यादी न दिल्याने उगलेवाडीचे पराग शंकर रामुगडे, भटक्या-विमुक्त जाती सदस्य असलेल्या संचालक मंडळाची यादी न जोडल्याने वाखरीचे रामचंद्र नाथा ढेकळे आणि संस्था संचालक नसल्याने कांताबाई ढेकळे यांचे अर्ज फेटाळण्यात आले, तर थकबाकीदार असल्याने दिपक ननावरे यांचाही अर्ज बाद ठरला.
​छाननी प्रक्रिया पूर्ण झाली असली तरी अद्याप निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झालेले नाही. आतापर्यंत केवळ एका उमेदवाराने माघार घेतल्याने सध्या तरी कोणत्याही मतदारसंघात बिनविरोध निवडीची चिन्हे नाहीत. अर्ज माघारीची मुदत संपल्यानंतरच प्रत्यक्ष लढतींचे नेमके स्वरूप समोर येणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी मिस्टर रामराजेंची मध्यरात्री धावपळ
पुढील बातमी
सातारा हिल रनर्सचा द्वितीय वर्धापन दिन उत्साहात; डॉ. सुधीर पवार यांचा सपत्नीक विशेष गौरव

संबंधित बातम्या