कोरेगाव : कोरेगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक घनश्याम बल्लाळ यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप घेत, तसेच आसरे येथील कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी सोमवारी कोरेगाव पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन केले. दुपारी तीन वाजता अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी तक्रारींची सखोल चौकशी करून कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले.
आमदार शशिकांत शिंदे यांनी पोलीस निरीक्षकांच्या दालनात सकाळी अकरा वाजता ठिय्या मांडला. जोपर्यंत पोलीस अधीक्षक तुषार दोशी स्वतः येऊन चर्चा करत नाहीत, तोपर्यंत माघार घेणार नसल्याचा पवित्रा त्यांनी घेतला. यावेळी पोलीस उपअधीक्षक राजश्री तेरणी यांनी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मात्र तो निष्फळ ठरला. अखेर दुपारी सव्वा दोनच्या सुमारास अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आ. शिंदे यांच्याशी चर्चा केली.
यावेळी आ. शिंदे यांनी पोलीस प्रशासनावर गंभीर आरोप केले. ते म्हणाले, ‘‘कोरेगाव पोलिसांकडून आसरे गावात दहशतीचे वातावरण निर्माण केले जात आहे. पोलिसांची जीप दररोज गावात जाऊन, ज्यांच्यावर जीवघेणे हल्ले झाले आहेत, अशांवरच दबाव टाकत आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय दबावापोटी खोटे गुन्हे दाखल करणे, अदखलपात्र गुन्ह्यात त्रास देणे, अवैध धंद्यांकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार वाढले आहेत.’’ संबंधित अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी त्यांनी लावून धरली. श्रीमती कडूकर यांनी या सर्व बाबींची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यावेळी सहिलबाबा शिंदे, अरुण माने, राजाभाऊ जगदाळे, संजय पिसाळ, सागर साळुंखे, ॲड. पांडुरंग भोसले, जयवंतराव घोरपडे, प्रतापराव कुमुकले, प्रतिभा बर्गे, तालुकाध्यक्ष घनश्याम शिंदे, सचिन झांजुर्णे यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पोलीस ठाण्याबाहेर तणाव
चर्चेदरम्यान बराच वेळ तोडगा न निघाल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्याबाहेर जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून सातारा मुख्यालयातून जलद कृती दलाच्या जवानांसह पुसेगाव व रहिमतपूर पोलिसांची कुमक मागवण्यात आली होती.
अक्षय शिंदेंच्या चौकशीची मागणी
तडवळे संमत कोरेगाव येथील पोलीस शिपाई अक्षय शिंदे यांच्या कार्यपद्धतीबाबतही आ. शिंदे यांनी तक्रार केली. यावर अप्पर पोलीस अधीक्षकांनी पुराव्यासाठी व्हिडिओ शूटिंगची मागणी केली. मात्र, आ. शिंदे यांच्या निवासस्थानी अक्षय शिंदे गेले असतानाचे शूटिंग असूनही कारवाई का झाली नाही, असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला.