नवी दिल्ली : गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर आज पहाटे पृथ्वीवर पोहोचले आहेत. विल्यम्स पृथ्वीवर पोहोचल्यानंतर जगभरातून त्यांचं स्वागत सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला असून सोशल मीडियावर एक सुंदर पोस्ट शेअर केली आहे.
पीएम नरेंद्र मोदी यांनी पोस्टमध्ये लेहिले की, "क्रू9, पुन्हा स्वागत आहे! पृथ्वीला तुमची आठवण येते. सुनीता विल्यम्सचा अंतराळ स्थानकावरील अनुभव संयम, धैर्य आणि अमर्याद मानवी भावनांची परीक्षा होती. सुनीता विल्यम्स आणि क्रू 9 मोहिमेतील अंतराळवीरांनी पुन्हा एकदा आपल्याला दाखवून दिले आहे की चिकाटीचा खरा अर्थ काय आहे. ही घटना लाखो लोकांना कायमची प्रेरणा देईल."
पंतप्रधान मोदींनी पुढे लिहिले की, "अंतराळ संशोधन म्हणजे मानवी क्षमतेच्या मर्यादा ओलांडणे, स्वप्ने पाहण्याचे धाडस करणे आणि ती स्वप्ने प्रत्यक्षात आणण्याचे धाडस करणे. एक अग्रणी आणि आयकॉन, सुनीता विल्यम्स यांनी त्यांच्या संपूर्ण कारकिर्दीत या भावनेचे उदाहरण दिले आहे. त्यांचे सुरक्षित पुनरागमन सुनिश्चित करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या सर्वांचा आम्हाला अभिमान आहे. जेव्हा परिपूर्णता आणि आवड एकत्र येते आणि तंत्रज्ञान आणि चिकाटी एकत्र येते तेव्हा काय होते हे त्यांनी दाखवून दिले आहे."
अंतराळवीर निक हेग, बुच विल्मोर, सुनीता विल्यम्स आणि रोसकॉसमॉस अंतराळवीर अलेक्झांडर गोर्बुनोव्ह यांना पृथ्वीवर परत घेऊन जाणारे कॅप्सूल फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर उतरले. समुद्रात उतरल्यानंतर, अंतराळयानात बसलेल्या चारही प्रवाशांचे नासाने स्वागत केले. नियंत्रण केंद्रातून अंतराळवीरांचे स्वागत "निक, अॅलेक, बुच, सुनी - स्पेसएक्स मधून घरी स्वागत आहे" या संदेशाने करण्यात आले.
सुनीता विल्यम्स पृथ्वीवर परतल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही प्रतिक्रिया दिली. डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, जे काही आश्वासन दिले होते ते पूर्ण केले. आज ते 'अमेरिकेच्या गल्प' मध्ये सुरक्षितपणे परतले, एलॉन मस्क, स्पेसएक्स आणि नासाचे आभार! या यशस्वी मोहिमेनंतर, एलॉन मस्क म्हणाले, "अंतराळवीरांच्या सुरक्षित परतीबद्दल स्पेसएक्स आणि नासा टीमचे अभिनंदन! या मोहिमेला प्राधान्य दिल्याबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार!"