सातारा : सातारा शहरातील एका ज्वेलरी शॉप मधून सोने खरेदी करून बनावट फोन पे चा वापर करून गंडा घालणाऱ्या भामट्यास जेरबंद करण्यात सातारा शहर डीबी पथकाला यश आले आहे.
फरीद रौफ बागवान रा. विक्रांत नगर, कोडोली, सातारा असे ताब्यात घेण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 6 रोजी सातारा शहरातील अमर लक्ष्मी स्टॉप परिसरात असणाऱ्या ब्रह्मचैतन्य ज्वेलरी शॉप दुकानामध्ये सायंकाळी एक युवक सोने खरेदीसाठी गेला होता. तेथे त्याने सोन्याची कर्णफुले घेऊन दुकान मालकास फोन पे वरून पैसे ट्रान्सफर केल्या बाबतचा मेसेज दाखवला. त्यानंतर दुकान मालकाने फोन पे वर पैसे आल्याची खात्री केली असता ते आले नसल्याचे दिसून आले. त्यामुळे दुकानदाराने त्यास अटकाव केला असता या युवकाने त्यांना धक्का देऊन तो मोटरसायकल वरून पळून गेला. याबाबत सातारा शहर पोलीस ठाण्यात संबंधिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली सातारा शहर डीबी पथकाने घटनास्थळी जाऊन त्या ठिकाणची माहिती घेऊन सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यानंतर पथकाने या युवकाची गोपनीय बातमीदारांमार्फत ओळख पटवली. तेव्हा हा युवक शिवराज पेट्रोल पंप परिसरामध्ये राहत असल्याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे असलेल्या मोबाईलची तपासणी केली तेव्हा त्याच्या फोन पे ॲप्लीकेशन मध्ये फक्त पैसे ट्रान्सफर झाले असल्याचा मेसेज फ्लॅश होत होता. हा मेसेज दुकानदारास दाखवल्यावर तो खऱ्या फोन पे ॲप्लीकेशन सारखा दिसत असल्याने त्याद्वारे फसवणूक होत असल्याचे उघड झाले. यानंतर त्याच्याकडून फसवणूक करून घेतलेले 22 हजार रुपये किंमतीचे सोने जप्त करण्यात आले आहे.
या कारवाईत पोलीस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे सपोनि शामराव काळे, पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पोलीस हवालदार निलेश यादव, सुजित भोसले, निलेश जाधव, विक्रम माने, पोलीस नाईक पंकज मोहिते, पोलीस कॉन्स्टेबल सचिन रिटे, इरफान मुलाणी, संतोष घाडगे, सागर गायकवाड, विशाल धुमाळ, मच्छिंद्रनाथ माने, सुशांत कदम, तुषार भोसले, सुहास कदम यांनी सहभाग घेतला.
अशा बनावट एप्लीकेशन द्वारे फसवणुकीचे प्रकार होत असल्याने पैसे पाठवणाऱ्याने पैसे ट्रान्सफर झाल्याचा मेसेज दाखवला तरी फोन पे, गुगल पे, पेटीएम ॲपवर पैसे आल्या बाबतची खात्री झाल्यावरच व्यवहार करण्यात यावा, असे आवाहन सातारा शहर पोलिसांकडून करण्यात आले आहे.