५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धांचे साताऱ्यात भव्य आयोजन; १४ ते १७ मे दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियममध्ये रंगणार राष्ट्रीय कुस्तीचा महासंग्राम

by Team Satara Today | published on : 11 May 2026


सातारा  : भारतीय पारंपरिक कुस्तीच्या वैभवशाली परंपरेला उजाळा देणाऱ्या ५२ व्या हिंदकेसरी पुरुष व महिला अजिंक्यपद कुस्ती स्पर्धांचे यंदा साताऱ्यात भव्य आयोजन करण्यात आले आहे. भारतीय शैली कुस्ती महासंघ, महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती महासंघ, राजेश्वर प्रतिष्ठान सातारा आणि तालीम संघ सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा १४ ते १७ मे दरम्यान छत्रपती शाहू स्टेडियम येथे पार पडणार आहे. तब्बल २२ वर्षांनंतर साताऱ्याला हिंदकेसरी स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याने जिल्ह्यातील कुस्तीप्रेमींमध्ये मोठा उत्साहाचे वातावरण आहे.

या स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत संयोजन समितीचे निमंत्रक दीपक पवार आणि राजेश्वर प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुधीर पवार उपस्थित होते. यावेळी महाराष्ट्र राज्य भारतीय शैली कुस्ती संघाचे सचिव मोहन खोपडे, राष्ट्रीय महासचिव गौरव रोशनलालजी आदी मान्यवर उपस्थित होते.

साहेबराव पवार यांच्या शतकपूर्ती वर्षानिमित्त विशेष आयोजन

दीपक पवार यांनी सांगितले की, साताऱ्याचे प्रसिद्ध पैलवान आणि क्रीडामहर्षी साहेबराव पवार (भाऊ) यांच्या शतकपूर्ती वाढदिवसानिमित्त या कुस्ती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. सातारा जिल्ह्याला कुस्तीचा समृद्ध वारसा लाभला असून पैलवान खाशाबा जाधव, श्रीरंग अप्पा जाधव, बाबुराव चव्हाण, अमर पैलवान मारुती वडार, शामराव मुळीक, निजाम पैलवान, बळीराम चौकवले यांसारख्या नामवंत पैलवानांनी साताऱ्याच्या कुस्ती परंपरेला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळवून दिली आहे.

देशभरातील नामांकित पैलवानांचा सहभाग

या स्पर्धेसाठी देशातील २८ राज्यांमधून सुमारे ६०० पुरुष आणि २५० महिला कुस्तीपटू सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय दर्जाचे पंच आणि अधिकारीही या स्पर्धेत उपस्थित राहणार आहेत. चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत देशातील आणि राज्यातील अनेक नामवंत मल्ल सहभागी होणार असल्याने शाहू स्टेडियममध्ये कुस्तीप्रेमींना थरारक सामने पाहण्याची संधी मिळणार आहे. विशेष म्हणजे महिला हिंदकेसरी स्पर्धांनाही यंदा मोठे महत्त्व देण्यात आले असून राष्ट्रीय स्तरावरील महिला कुस्तीपटूंच्या ताकदीचा आणि कौशल्याचा अनुभव साताऱ्यातील प्रेक्षकांना घेता येणार आहे.तब्बल ३०० महिला कुस्तीपटू साताऱ्यात येणार असून त्यांच्या निवासाची सोय यशोदा शिक्षण संस्था येथे करण्यात आली आहे .

विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची घोषणा - स्पर्धेतील विजेत्यांसाठी आयोजकांनी लाखो रुपयांची आकर्षक बक्षिसे जाहीर केली आहेत. पुरुष हिंदकेसरी गटामध्ये ८५ ते १४० किलो वजनी गटासाठी — प्रथम क्रमांक : थार गाडी आणि १ किलो चांदीची गदा. द्वितीय क्रमांक : ट्रॅक्टर, तृतीय क्रमांक : बुलेट मोटारसायकल. चतुर्थ क्रमांक : दुचाकी वाहन. 

महिला हिंदकेसरी गट (६५ ते ९० किलो) —प्रथम क्रमांक : दुचाकी वाहन. द्वितीय क्रमांक : ₹५० हजार रोख, तृतीय क्रमांक : ₹२० हजार, चतुर्थ क्रमांक : ₹२० हजार, इतर वजनी गटांमध्ये — प्रथम क्रमांक : सेलेरिओ चारचाकी वाहन, द्वितीय क्रमांक : होंडा अ‍ॅक्टिव्हा, तृतीय क्रमांक : ₹५० हजार, चतुर्थ क्रमांक : ₹२५ हजार रोख

पाच कोटींचा भव्य कुस्ती सोहळा

या राष्ट्रीय स्पर्धेसाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याची माहिती आयोजकांनी दिली. साताऱ्याच्या क्रीडा इतिहासातील हा सर्वात मोठा कुस्ती सोहळा ठरणार असून, कुस्तीच्या माध्यमातून साताऱ्याची परंपरा पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर झळकणार आहे.

सातारकरांना उपस्थितीचे आवाहन

“हिंदकेसरी”सारखी प्रतिष्ठेची स्पर्धा साताऱ्यात होत असल्याने सर्व क्रीडाप्रेमींनी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या कुस्ती महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन संयोजन समितीचे निमंत्रक दीपक पवार आणि सुधीर पवार यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संत-महंतांनी समाजप्रबोधनात सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक - हेमंत हरहरे; धर्माचार्य परिषद उत्साहात
पुढील बातमी
शासकीय जागेच्या वापरावरून सातारा क्लब वादाच्या भोवऱ्यात; माहिती अधिकारातून उघड झाले प्रश्न; पत्रकार परिषदेत सदस्यांनी केली चौकशीची मागणी

संबंधित बातम्या