सातारा : प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस नुकताच दिनांक 17 सप्टेंबर रोजी पार पडला. मा. प्रधानमंत्री यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत मुख्यमंत्री सहाय्यता निधी तथा धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष सातारा व जिल्हा प्रशासनाच्या वतीने 'नमो नेत्र संजीवनी अभियान' 2 ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
सातारा जिल्हा रुग्णालय येथे पार पडलेल्या बैठकीवेळी ते बोलत होते. या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, नेत्रविकारतज्ञ डॉ. चंद्रकांत काटकर, सातारा जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे अध्यक्ष डॉ. रविराज निकम आदी उपस्थित होते.
या अभियानात सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत येणारे सर्व रुग्णालये व धर्मादाय रुग्णालये तसेच महात्मा फुले जीवनदायी योजनेअंतर्गत येणारी रुग्णालय आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा नेत्रचिकित्सा विषयात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांमार्फत नेत्र तपासणी शिबिरे होणार आहेत. ज्या रुग्णांना मोफत चष्मे तथा मोतीबिंदू शस्त्रक्रियेची गरज आहे. अशांची तपासणी करून मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत, तसेच नेत्रदान नोंदणी देखील केली जाणार आहे. त्यामुळे वंचित घटकांना व नेत्रविकारग्रस्तांना नेत्र संजीवनी मिळणार आहे, असेही जिल्हाधिकारी पाटील यांनी सांगितले.