सातारा : राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचे वाढते संकट लक्षात घेऊन सातार्यातील जलमंदिर पॅलेस येथे होणारा ऐतिहासिक शाही विजयादशमी सीमोल्लंघन सोहळा यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय खासदार श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी घेतला आहे. उत्सवाच्या निमित्ताने अनावश्यक खर्च, बॅनरबाजी आणि दिखाऊपणा टाळून दुष्काळग्रस्त शेतकरी व नागरिकांना मदतीचा हात द्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.
सातार्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक परंपरेशी जोडलेल्या या सोहळ्याला विशेष महत्त्व आहे. श्री भवानी तलवारीचे पूजन, शाही पालखी मिरवणूक, पोवई नाक्यावरील ऐतिहासिक वेशीचे पूजन आणि जलमंदिर पॅलेस येथे मिरवणुकीचे स्वागत, औक्षण व पूजनानंतर आपट्याचे सोने स्वीकारण्याची परंपरा यंदाही कायम राहणार आहे. मात्र, उत्सव साजरा करताना परिस्थितीचे भान राखण्यावर उदयनराजे यांनी भर दिला आहे.
राज्यातील अनेक भागांत पावसाने ओढ दिल्याने पाणीटंचाई तीव्र झाली आहे. शेतीसमोरील आर्थिक अडचणी वाढल्या असून, पशुधनाचे संगोपन करणेही शेतकर्यांसाठी आव्हानात्मक ठरत आहे. अशा वेळी मोठ्या प्रमाणावर खर्च करून उत्सव साजरा करण्यापेक्षा गरजूंच्या मदतीसाठी संसाधने वापरणे अधिक महत्त्वाचे असल्याची भूमिका त्यांनी मांडली.
परंपरा कायम, मात्र दिखाऊपणाला फाटा
शाही सीमोल्लंघन सोहळा परंपरेनुसार पार पडणार असला, तरी यंदा त्यात अनावश्यक खर्चाला प्राधान्य दिले जाणार नाही. सोहळ्याच्या निमित्ताने बॅनर लावणे, जाहिरातबाजी करणे आणि दिखाऊपणासाठी खर्च करणे टाळावे, असे आवाहन उदयनराजे यांनी कार्यकर्ते आणि नागरिकांना केले आहे.
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी पुढाकार घ्या
वैयक्तिक तसेच सार्वजनिक जीवनातील अनावश्यक खर्च कमी करून दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी सर्वांनी पुढे यावे. प्रत्येकाने आपल्या क्षमतेनुसार योग्य पद्धतीने मदत केल्यास संकटाचा सामना करणार्या शेतकरी कुटुंबांना आणि नागरिकांना आधार मिळू शकतो, असे उदयनराजे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
ऐतिहासिक शाही सीमोल्लंघन सोहळा यंदा साधेपणाने साजरा करण्याचा निर्णय; उत्सवावरील खर्च टाळून शेतकरी, पशुधन आणि संकटग्रस्तांना मदतीचे खा. उदयनराजेंचे आवाहन
by Team Satara Today | published on : 13 October 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा