विकासाच्या मुद्यांवर समर्थनगर ग्रामपंचायतीची ग्रामसभा वादळी

प्रशासन धारेवर, नागरिक आक्रमक

by Team Satara Today | published on : 30 August 2025


सातारा : सातारा शहरालगत असलेल्या समर्थनगर ग्रामपंचायतची 20 ऑगस्ट ची तहकूब ग्राम सभा उपसरपंच सौ. संगीता माने, विद्यमान सदस्य व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत पार पडली. आरोप-प्रत्यारोपामुळे ही ग्रामसभा वादळी ठरली.

ग्रामपंचायत सभेमध्ये वेगवेगळ्या विषयांची यादी होती. यामध्ये प्रामुख्याने मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे प्रस्तावित करून मान्यता देणे, शोषखड्डा, वृक्ष लागवड, माझी वसुंधरा अभियान तसेच केंद्रशासन 15 वित्त आयोगाच्या निधीमध्ये आर्थिक व भौतिक अहवाल याचा समावेश करण्यात आला होता.

देगाव फाटा येथील रस्त्यावर गेल्या चार महिन्यापासून दुर्गंधीयुक्त पाणी मुख्य रस्त्यावरून वाहत असून समर्थनगर ग्रामपंचायतीच्या वतीने कोणतीच कारवाई न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले होते. उपसरपंच सौ. संगीता माने यांनी समर्थनगर ग्रामपंचायत गेल्या चार महिन्यापासून सार्वजनिक बांधकाम उपविभागीय अभियंता प्रशांत खैरमोडे संपर्कात असून संबंधीत विभागाकडून सहकार्य मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जावळीच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागीय  अभियंता पवार यांना थेट ग्रामसभेतूच दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता त्यांनी प्रत्यक्ष भेट देण्याचे आश्वासन दिले जर संबंधित प्रश्नावर प्रशासनाकडून तोडगा न निघाल्यास ग्रामस्थांबरोबर आम्ही सुद्धा सर्व सदस्यासह रस्ता रोको आंदोलनात सहभागी होवू, अशी ग्वाही उपसरपंच सौ. संगीता माने यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली.

यावेळी हेमंत देशमुख यांनी स्ट्रीट लाईट खरेदी घोटाळा चौकशी दरम्यान दोषी आढळलेल्या तत्कालीन सरपंच सौ. शुभांगी डोर्ले व तत्कालीन ग्रामपंचायत अधिकारी सुरेश लादे यांना प्रत्येकी एकूण 69 हजार 873 रुपये भरण्याचे आदेश गट विकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी 21 एप्रिल रोजी ग्रामपंचायतीस दिलेल्या पत्रात नमूद केले असून ही रक्कम दोन दिवसात समर्थनगर ग्रामपंचायतीच्या खात्यावर भरण्याचे आदेश देऊन सुद्धा अद्यापि सौ. शुभांगी डोर्ले यांनी ही रक्कम भरली नसल्याने समर्थ नगर ग्रामपंचायत भ्रष्टाचार करत असलेल्यांना पाठीशी घालत असल्याचा गंभीर आरोप हेमंत देशमुख यांनी केला. तसेच येत्या 8 दिवसात ही रक्कम वसूल करण्यास समर्थनगर ग्रामपंचायतीकडून हयगय झाल्यास समर्थ नगर ग्रामपंचायतीचे ग्रामस्थ घरपट्टी किंवा कोणताच कर भरणार नाहीत, असा गंभीर इशारा त्यांनी दिला. दरम्यान, तत्कालीन सरपंच शुभांगी डोर्ले यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काही ग्रामस्थांनी केली.

यावेळी झालेल्या ठरावात चैताली व निशिगंधा सोसायटी येथील रस्त्याच्या दोन्ही बाजूस संरक्षक कठडे बसवणे, देगाव फाटा येथील गटर संबंधी शासनाच्या विभागाशी पत्रव्यवहार करून बोंबाबोंब आंदोलनाची दिशा ठरवणे तसेच ग्रामपंचायत कर्मचार्‍यांसाठी दैनिक हजेरीसाठी बायोमेट्रीक मशीन बसवणे असा प्रस्ताव  सुमंत मोरे यांनी मांडला असता तो ठराव तत्काळ मंजूर करण्यात आला.

यावेळी उपसरपंच सौ. संगीता माने, सदस्य सौ. विद्या हिरेमठ, सौ. सुप्रिया मोरे, सौ. विद्या पाटील, सदस्य संजय भोसले तसेच ग्रामपंचायत अधिकारी शंकर माने, समर्थनगर ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

 आजच्या ढगाळ वातावरणात झालेल्या समर्थनगर ग्रामपंचायतीच्या वादळी ग्रामसभेची चर्चा मात्र सर्वत्र चर्चेचा विषय ठरली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एआय तंत्रज्ञान आणि सायबर सिक्युरिटी बाबत माहिती गरजेची
पुढील बातमी
फरार अट्टल गुन्हेगार सातारा शहर पोलिसांच्या ताब्यात

संबंधित बातम्या