सातारा : जावली तालुक्याचे मुख्य ठिकाण असलेल्या मेढा नगरीचा स्मशानभूमीचा प्रश्न जागेअभावी अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. हा प्रश्न सोडवण्यासाठी आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या प्रयत्नांना यश मिळाले असून मेढा नगरीच्या अत्याधुनिक, सुसज्ज स्मशानभूमी उभारण्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. कण्हेर धरणासाठी संपादीत क्षेत्रातील १ एकर जागा मेढा नगरीच्या स्मशानभूमीसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. याबद्दल आ. शिवेंद्रसिंहराजेंनी उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.
जावली तालुक्याचे ठिकाण असलेल्या मेढा नगरीला अत्याधुनिक सोयींनीयुक्त स्मशानभूमी नसल्याने मोठी गैरसोय होत असते. मेढा नगरीसाठी अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्यात यावी अशी मागणी येथील नागरिकांनी आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्याकडे केली होती. या स्मशानभूमीला शासकीय जागा उपलब्ध व्हावी यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजेंचा पाठपुरावा सुरु होता. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचनेनुसार कण्हेर धरणासाठी संपादीत असलेल्या क्षेत्रातील १ एकर जागा स्मशानभूमीला मिळावी असा प्रस्ताव राज्याच्या जलसंपदा विभागाकडे पाठवण्यात आला होता. आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मेढा स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती.
आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या मागणीनुसार ना. फडणवीस यांनी मेढा स्मशानभूमीला जागा उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. त्यानुसार मेढा नगरीच्या अत्याधुनिक स्मशानभूमी उभारणीसाठी कण्हेर धरणासाठी संपादीत क्षेत्रातील १ एकर जागा (जी जुन्या स्मशानभूमीलगत आहे ती) प्रचलीत रेडीरेकनर दरानुसार व एसबीआय प्राईम लँडिंग दरानुसार येणारा भाडेपट्टा प्रतिवर्षी निश्चित करून भाडेपट्ट्याने देण्याचा निर्णय नियामक मंडळाने घेतला आहे. त्यामुळे मेढा नगरीला अत्याधुनिक स्मशानभूमी उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. आता १ एकर जागेत सुसज्ज स्मशानभूमी, लोकांसाठी बसण्याची आणि पाण्याची व्यवस्था तसेच इतर सुविधा उपलब्ध होणार आहेत. मेढा नगरीचा स्मशानभूमीचा महत्वाचा आणि जिव्हाळ्याचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल मेढावासियांनी आ. शिवेंद्रसिंहराजेंचे आभार मानले आहेत.