सातारा जिल्ह्यात गणेश जयंती पारंपारिक उत्साहाने साजरी

सातारा : सातारा जिल्ह्यात शनिवारी गणेश जयंती सोहळा धार्मिक व भक्तिमय वातावरणात उत्साहात साजरा करण्यात आला. श्री गणेशाच्या दर्शनासाठी ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये भाविकांच्या सकाळपासून रांगा लागल्या होत्या. श्री जन्मकाळ, श्री आरती तसेच विविध धार्मिक उपक्रमाने गणेश जयंतीचा कार्यक्रम सातारा शहरातील विविध गणेश मंदिरामध्ये पार पडला.

जिल्ह्यासह सातारा शहरात दरवर्षी गणेश जयंती सोहळा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. शहरातील पंचमुखी, खिंडीतला गणपती, ढोल्या गणपती, अजिंक्य गणेश, गारेचा गणपती, कृष्णानगरचा सुविधा गणेश, राजवाड्यावरचा अजिंक्य गणेश इत्यादी मंदिरांमध्ये आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. धार्मिक कार्यक्रमांसाठी ही सर्व मंदिरे सज्ज झाली होती. सकाळी सात वाजल्यापासूनच मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या. गणेशयाग, श्री अभिषेक, पंचामृत आरती, प्रदक्षिणा, गणेश आरती असे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तीमय वातावरणात पार पडले.

सातारा शहरातील फुटका तलाव गणेश मंदिर गणेश जयंतीच्या दिवशी विद्युत रोषणाईने उजळून निघाले होते. खिंडीतील गणपती आणि ग्रामदैवत ढोल्या गणपती येथे गणेश दर्शनासाठी भाविकांनी सकाळी सहा वाजल्यापासून गर्दी केली होती. जास्वंदीची फुले, दुर्वांचे हार अर्पण करून भाविकांनी गणेशाचे दर्शन घेतले. पंचमुखी गणेश मंदिर येथे सुद्धा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.



मागील बातमी
राहत्या घरातून वृद्धा बेपत्ता
पुढील बातमी
केंद्राचा अर्थसंकल्प; विकसित भारताचे प्रतिबिंब

संबंधित बातम्या