सातारा : जम्मू-काश्मीरमधील उरी सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेजवळ झालेल्या एका भीषण आणि अचानक झालेल्या स्फोटात भारतीय लष्कराचे दोन जवान शहीद झाले आहेत. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणारे हे दोन्ही वीर जवान महाराष्ट्राचे सुपुत्र होते. यामध्ये सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापुर गावचे रहिवासी वीरजवान अर्जुन जाधव शहीद झाले आहेत.
मंगळवारी उशिरा संध्याकाळी उरी येथील कमलकोट भागात नियंत्रण रेषेजवळ गस्त घालत असताना हा स्फोट झाला. या घटनेमुळे संपूर्ण देशासह महाराष्ट्रावर शोककळा पसरली असून, वीर जवानांच्या गावी अत्यंत दुःख व्यक्त केले जात आहे. या स्फोटात वीरमरण आलेल्या दोन्ही जवानांची ओळख पटली असून, वीर जवान विक्रम चव्हाण हे ऐरोली (नवी मुंबई) येथील रहिवासी होते. तर वीर जवान अर्जुन जाधव हे महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यातील शहापुर गावचे रहिवासी होते.
मंगळवारी संध्याकाळी कमलकोट येथे झालेल्या या अचानक स्फोटात दोन्ही जवान गंभीररित्या जखमी झाले होते. लष्कराच्या इतर सहकाऱ्यांनी तात्काळ बचाव मोहीम राबवून दोन्ही जखमी जवानांना उपचारासाठी श्रीनगरच्या बदामीबाग येथील '९२ बेस हॉस्पिटल'मध्ये दाखल केले. डॉक्टरांच्या पथकाने त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले, मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
हा स्फोट नेमका कशामुळे झाला भूसुरुंग की इतर कोणत्याही कारणामुळे याचा तपास लष्कराकडून केला जात आहे. दोन्ही हुतात्मा जवानांचे पार्थिव कायदेशीर प्रक्रियेनंतर लष्करी इतमामात त्यांच्या मूळ गावी रवाना केले जाणार आहे.