सातारा : विद्येची देवता आणि संपूर्ण भारत देशाचेच आराध्य दैवत असणार्या श्री गणरायाच्या आगमनाला दोन आठवडे शिल्लक आहेत. सातारा शहरातील कुंभारवाड्यामध्ये श्रीमूर्तींवरून अंतिम हात फिरवला जात असून, सातार्यात मंडप उभारणीसाठी गणेश मंडळांची तयारीची लगबग सुरू आहे. दुसरीकडे मोठ्या गणेश मंडळांनी अधिकाधिक उंच गणेश मूर्तींची पारंपारिक प्रथा कायम ठेवली आहे.
शाडू मातीची टंचाई यामुळे या मातीच्या मूर्ती व पी.ओ.पी.च्या गणेश मूर्ती वीस टक्क्यांनी महागल्याचे गणेश मूर्ती विक्रेत्यांनी सांगितले. सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव अत्यंत आनंदाने साजरा होत आहे. 7 सप्टेंबर रोजी गणरायांचे आगमन होत आहे. सातारा शहरांमध्ये 200 पेक्षा अधिक छोटी-मोठी मंडळे आहेत. या मंडळांनी गणेशोत्सवाची तयारी सुरू केली आहे. गणरायांच्या आगमनासाठी गणेश भक्तांमध्ये मोठा उत्साह आहे. यामुळे मोठ्या उंचीच्या मूर्ती व सामाजिक विषयांवरील आरास अधिक चांगल्या पद्धतीने करण्यावर भर दिला जात आहे. यंदा काही मंडळांकडून पुन्हा जिवंत देखावे सादर केले जातील, अशी अपेक्षा आहे. बहुतांश गणेश मंडळांनी गणपतीची वर्गणी जमा करून कोणते कार्यक्रम घ्यायचे तसेच आरास करण्याचे बजेट काढून घेऊन तयारी सुरू केली आहे.
नगरपालिका, पोलीस प्रशासनाने एक खिडकी योजना सुरू करून मंडळाच्या पदाधिकार्यांना विविध प्रकारच्या लागणार्या परवानग्या देण्याचे काम सुरू झाले आहे. शहरातील वेगवेगळे खड्डे बुजवण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली असून, रस्त्याच्या डांबरीकरणासाठी पुन्हा 20 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. डेकोरेशनचे साहित्य बाजारपेठेत विक्रीसाठी आले आहे. थर्मोकोल पासून बनवलेल्या साहित्यांना बंदी आहे. त्यामुळे इतर पर्याय वापरून डेकोरेशनचे साहित्य, फुलांच्या माळा, रोषणाई, सजावटीचे साहित्य बाजारपेठेत उपलब्ध झाले आहे.
गणेशाच्या पूजेसाठी गुलाल, लहान पाट, लाल रंगाचे आसन, पूजनासाठी लागणार्या वस्तूंची दुकाने बाजारपेठेत सजू लागली आहेत. यंदा राज्य शासनाने पी.ओ.पी. मूर्तींवर बंधने घालण्याचे धोरण घेतले होते. मात्र शाडू मातीची अनुपलब्धता तसेच मूर्ती बनवण्यावरच्या मर्यादा, कारागिरांची टंचाई यामुळे यावर्षी सुद्धा पीओपीच्या मुर्त्यांनाच थोडासा प्राधान्यक्रम राहावा, असा आग्रह धरला जात होता. त्यानुसार शाडू मातीचे धोरण तात्पुरते बाजूला ठेवून पी.ओ.पी.च्या मुर्त्यांसाठी लवचिक धोरण स्वीकारण्यात आल्याने मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला.
श्री मूर्ती 20 ते 22 टक्क्याने महाग
यंदा कारागिरांची टंचाई तसेच कच्च्या मालाच्या महागलेल्या किमती, रंगांचे महागलेले दर यामुळे शाडू आणि पीओपी या दोन्ही प्रकारच्या श्रीमूर्ती 20 ते 22 टक्क्याने महागल्याचे मूर्तिकारांनी सांगितले आहे. गणेश मूर्तींचे माहेरघर असणार्या पेण येथे सुद्धा गणेश मूर्तींना महागाईचा फटका बसल्याचे चित्र आहे. तिथून मूर्ती सातार्यात आणायच्या वाहतुकीचा दरही वाढल्याने यंदा गणेश भक्तांच्या खिशाला चांगलीच चाट बसणार आहे.