जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सातारा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले; मतदार प्रतिनिधी ठरवताना मोठी चुरस

by Team Satara Today | published on : 04 August 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रतिनिधी निश्चित करण्याची ठराव प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहचली आहे. त्यामुळे सातारा तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. गावागावांत मतदानाचा ठराव कोणाच्या बाजूने होणार, यावरून विविध गटांमध्ये जोरदार चुरस पहायला मिळते आहे. अनेक ठिकाणी राजकीय समीकरणे बदलताना दिसत आहेत.

सातारा तालुक्यात या प्रक्रियेसाठी ५५१ संस्था पात्र ठरल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत २३२ संस्थांचे ठराव सहायक निबंधक कार्यालयात प्राप्त झाले आहेत. अजून ३१९ ठराव येणे बाकी आहेत. मतदान प्रतिनिधी नियुक्तीचे ठराव सादर करण्याची अंतिम मुदत ५ ऑगस्ट असल्याने आता दोन दिवस राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहेत.

प्राप्त ठरावांमध्ये १२६ प्राथमिक कृषी पतपुरवठा संस्था, ४२ नागरी सहकारी पतसंस्था, २५ विविध कृषी व इतर उत्पादन संस्था, तसेच ३२ औद्योगिक, मजूर, ग्राहक, पाणीपुरवठा व इतर विविध संस्थांचा समावेश आहे. उर्वरित विविध प्रकारच्या सहकारी संस्थांचे ठराव अंतिम टप्प्यात आहेत. ठराव प्रक्रियेदरम्यान सातारा तालुक्यातील अनेक गावांमध्ये राजकीय हालचालींना वेग आला आहे.

संस्थांमधील मतदान प्रतिनिधी निश्चित करण्यासाठी विविध गटांकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. अनेक ठिकाणी विद्यमान समीकरणांना धक्का बसत आहे. काही संस्थांमध्ये मतदार प्रतिनिधी ठरवताना मोठी चुरस निर्माण झाली असून स्थानिक पातळीवर राजकीय उलथापालथी घडताना दिसत आहेत. ५ ऑगस्टनंतर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील पुढील रणनीती याच ठरावांवर अवलंबून राहणार आहे.

सातारा तालुक्यातील गावे सातारा-जावली, कोरेगाव आणि कराड उत्तर अशा तीन विधानसभा मतदारसंघांमध्ये विभागली गेली आहेत. बहुतांश गावांवर खा. उदयनराजे भोसले आणि ना. शिवेंद्रराजे भोसले या दोन बंधूंचे राजकीय वर्चस्व आहे. आ. महेश शिंदे आणि आ. मनोजदादा घोरपडे यांचेही राजकीय वर्चस्व त्यांच्या मतदारसंघांतील गावांमध्ये वाढलेले आहे. त्यामुळे राजेंसोबतच या दोन आमदारांच्या कार्यकत्यांमध्येही राजकीय इच्छाशक्ती वाढली असून तालुक्यात राजकीय समीकरणांचा दहिकाला पहायला मिळतो आहे.

या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खा. उदयनराजे मोसले, सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माजी मंत्री शशिकांत शिंदे, आ. मनोजदादा घोरपडे, आ. महेश शिंदे यांच्या समर्थकांमध्येही मोठी स्पर्धा पाहायला मिळत आहे. गावोगावी कार्यकर्ते संस्थांचे ठराव आपल्या गटाच्या बाजूने व्हावेत, यासाठी सक्रिय झाले असून, अनेक ठिकाणी एकमेकांसमोर उमे ठाकल्याचे चित्र आहे. सर्व ठराव स्पष्ट झाल्यावर सातारा तालुक्यातील राजकीय ताकद नेमकी कोणाच्या पारड्धात आहे, याचे प्राथमिक चित्र स्पष्ट होणार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे निधन
पुढील बातमी
सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतरावांच्‍या जिल्‍ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी - शशिकांत शिंदे यांची टीका

संबंधित बातम्या