सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसाठी ठरावांचा लिलाव होत असेल, तर ती अत्यंत दुर्दैवी बाब आहे. सहकाराची समृद्ध परंपरा असलेल्या सातारा जिल्ह्यात लोकशाही प्रक्रियेऐवजी सत्ता, पैसा आणि दबावाचे राजकारण पाहायला मिळत असेल, तर हा संपूर्ण सहकार चळवळीवरच कलंक आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी केली.
कोरेगाव येथे माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी सोसायट्यांच्या ठरावांचा लिलाव होत असल्याच्या चर्चेवर नाराजी व्यक्त केली. सातारा जिल्हा बँकेला महाराष्ट्रातील आदर्श सहकारी बँक म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी अनेक सहकार नेत्यांनी योगदान दिले. पूर्वी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून बँकेच्या हितासाठी निवडणुका होत असत. मात्र, आता प्रत्येक संस्थेवर सत्ता मिळवण्याच्या राजकारणामुळे बँकेच्या निवडणूक प्रक्रियेचे स्वरूप बदलत चालले आहे.
कराड तालुक्यातील कोडोली येथील सोसायटीत ठरावासाठी लिलाव पद्धत अवलंबल्याची चर्चा होत असल्याचा उल्लेख करत शिंदे म्हणाले, गावाने विचारपूर्वक ठराव करण्याऐवजी त्याचे आर्थिक व्यवहार होऊ लागणे ही चिंताजनक बाब आहे. आज लोकशाहीतून निवडणुका होण्याऐवजी सत्ता, पैसा, दडपशाही आणि हुकूमशाहीच्या जोरावर राजकारण सुरू आहे. ठरावांचा बाजार हा लोकशाहीचा पराभव असून, अशा पद्धतीने सहकारातील निवडणुका होणे दुर्दैवी आहे, अशी टीका त्यांनी केली.
जावली तालुक्यातील आखाडे गावात नुकताच ठराव प्रक्रियेदरम्यान झालेल्या गोंधळावरही त्यांनी भाष्य केले. बाहेरून काही संशयित व्यक्ती आल्याची माहिती पोलिसांना दिली असून, या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी मागणी शिंदे यांनी केली. कोणत्याही सभासदावर दबाव टाकून किंवा भीतीचे वातावरण निर्माण करून ठराव करून घेणे लोकशाहीला मारक असल्याचे त्यांनी सांगितले.