फलटण : शहरातील जिंती नाका परिसरात शनिवारी दुपारी दोन गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा झाल्याची घटना घडली. पोलिसांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्यासमोरच एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. याप्रकरणी फलटण शहर पोलिसांनी १३ जणांना अटक केली आहे, तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.
शहर पोलिस ठाण्याच्या माहितीनुसार, हवालदार संदीप दिलीप लोंढे यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. जिंती नाका येथे शनिवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास शिवशक्ती आणि जयभवानी तरुण गणेश मंडळाचे कार्यकर्ते आपापसांत वाद घालत होते. यावेळी पोलिसांनी त्यांना वाद न घालण्याविषयी आणि तक्रार असल्यास पोलिस ठाण्याला येऊन देण्याविषयी समजावले. पोलिस समजावून सांगत असतानाही कार्यकर्त्यांनी एकमेकांना शिवीगाळ सुरू केली.
काही क्षणांतच प्रकरण चिघळले आणि दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडांनी हल्ला चढवला. या घटनेमुळे सार्वजनिक शांततेचा भंग झाला. याप्रकरणी पोलिसांनी विशाल पांडुरंग माळी (वय ३०), देविदास बापू माळी (वय २५), संपत भरत माळी (वय २४), अजय पांडुरंग माळी (वय २९), रंगराव भरत माळी (वय २७), अमर राजू माळी (वय ३०), नेताजी प्रकाश माळी (वय २८), प्रकाश काळुराम माळी (वय ५१), अमोल आकाराम मोरे (वय २३),
रमेश संजय माळी (वय २६), अजय रघुनाथ माळी (वय ३२, सर्व रा. सगुणामातानगर, मलठण) तर जयभवानी तरुण गणेश मंडळ कुंभारभट्टी फलटण या मंडळातील एक अल्पवयीन मुलगा, सुशांत सुनील जुवेकर (वय १८), शंकर रामराव जुवेकर (वय ३०, सर्व रा. महतपुरापेठ, मलठण, ता. फलटण), अजय संजय जाधव (वय २५, रा. स्वामी समर्थ मंदिर, मलठण) यांना अटक केली आहे.