सातारा : सातारा शहरातील मोळाचा ओढा परिसरात अज्ञात चोरट्यांनी बंद घराला लक्ष्य करत लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. घरमालक बाहेरगावी असताना चोरट्यांनी मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला आणि कपाटातील मौल्यवान ऐवज लंपास केला.
पोलिसांच्या माहितीनुसार, अभिजात फॅक्टरीजवळील एका निवासस्थानी ३१ मे ते ४ जून या कालावधीत ही चोरी झाली. चोरट्यांनी सोन्याच्या बांगड्या, गंठण, चैन, पेंडंट, डायमंड अंगठी, टॉप्स तसेच इतर मौल्यवान दागिन्यांसह एकूण ७ लाख २ हजार १०८ रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. या प्रकरणी मनीषा विशाल पुजारी यांनी तक्रार दाखल केली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध घेण्याचे काम सुरू असून पोलीस उपनिरीक्षक गोवेकर पुढील तपास करत आहेत.