भारत इराण आणि इस्रायलमध्ये करणार मध्यस्थी

राजदूतांनी केला खुलासा

by Team Satara Today | published on : 04 October 2024


इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षामुळे सध्या जगभरातील देशांचं टेन्शन वाढलं आहे. आशिया खंडातील देशांना देखील चिंता सतावते आहे. कारण या संघर्षाचे गंभीर परिणाम जगाला भोगावे लागतील हे सगळ्यांना माहित आहे. त्यामुळेच हे युद्ध होऊ नये म्हणून सगळेच देश प्रयत्न करत आहेत. एकेकाळी मित्र असलेले इस्रायल आणि इराण हे दोन देश आता एकमेकांच्या विरोधात उभे आहेत. दोन्ही देशांमध्ये जर युद्ध झाले तर चीन आणि रशिया हे इराणला आणि अमेरिका-ब्रिटन हे देश इस्रायला पाठिंबा देतील. पण यामुळे सगळ्यांचंच नुकसान आहे. कारण युद्धातून कधीही मार्ग निघत नाही. त्याने फक्त हानीच होते. हीच गोष्ट भारताने नेहमची जगाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. भारत आजही सगळ्यांना चर्चतून मार्ग काढण्याच्या भूमिकेला पाठिंबा देतो.

आता इस्रायलने भारतामार्फत इराणला संदेश पाठवला आहे. या संदेशात त्यांनी इराणला संयम आणि सावधगिरी बाळगण्यास सांगितले आहे. इस्रायलचे भारतातील राजदूत रुबिन रुबेन अझर यांनी म्हटले आहे की, ज्या देशांमध्ये इस्रायलने इराणला संदेश पाठवला त्यात भारताचाही समावेश आहे. ते म्हणाले की इराणच्या अलीकडील हल्ल्यांमुळे तणाव वाढणार आहे, म्हणून आम्ही त्यांना इशारा दिला आहे. रुबिनने फर्स्टपोस्टला दिलेल्या मुलाखतीत ही माहिती दिली आहे.

फर्स्टपोस्टच्या रिपोर्टनुसार, रुबिन यांनी सांगितले की, आम्ही भारतासह अनेक देशांतून इराणला संदेश पाठवला आहे. आम्ही इराणला सांगितले आहे की त्यांनी इस्रायलवर हल्ला करू नये. सांगून ही जर त्यांनी हल्ला केला तर त्याची मोठी किंमत इराणला चुकवावी लागेल. इस्रायलच्या राजदूताच्या या वक्तव्यावरून आता भारत हा संघर्ष कमी करण्यासाठी काय भूमिका घेतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. भारताचे इराण आणि इस्रायल या दोन्ही देशांशी चांगले संबंध आहेत.

रुबिन पुढे म्हणाले की, ‘इस्रायलवर बऱ्याच काळापासून इराणकडून हल्ले होत आहेत. हे हल्ले इस्रायलला नष्ट करण्याच्या विचारसरणीपासून प्रेरित आहेत. जगाने याकडे कमी लक्ष दिले आहे. तेहरानवर आंतरराष्ट्रीय समुदायाचा दबाव निराशाजनक आहे. मात्र, दहशतवादाविरोधात भारताच्या ठाम भूमिकेचे त्यांनी कौतुक केले.

ते म्हणाले की, इस्रायलचे प्रत्युत्तराचे हल्ले स्वसंरक्षणार्थ होते. आपण प्रत्युत्तर दिले नाही तर त्याचे गंभीर परिणाम केवळ इस्रायलसाठीच नव्हे तर प्रदेश आणि जगासाठी होतील. आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन करून इराणने शेकडो क्षेपणास्त्रे डागली आहेत, त्यामुळे त्याला प्रत्युत्तर देणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

इराणकडून इस्रायलचा सर्वात जवळचा मित्र अमेरिकेलाही संदेश पाठवण्यात आला आहे. इराणने आपल्या भूमीवर इस्रायलकडून नवा हल्ला केल्यास त्याला जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल, असे इराणने म्हटले आहे. इस्रायलने नवा हल्ला करु नये म्हणून सगळ्याच देशांनी त्याला आवाहन केले आहे. कारण इस्रायल इराणच्या तेल खाणींना लक्ष्य करु शकतो असे म्हटले जात आहे. यामुळे जगात तेलाची कमतरता भासू शकते. इस्त्रायलने पायाभूत सुविधांनाही लक्ष्य करू शकते, असे इराणने म्हटले आहे.

अल जझीराने इराणच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, तेहरानने हा संदेश कतारच्या माध्यमातून अमेरिकेला पाठवला आहे. इस्रायलकडून सातत्याने हल्ले होत असतानाही आम्ही संयम राखला आणि संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला, मात्र आता एकतर्फी संयमाचे युग संपले आहे. इस्रायलचे कोणतेही नवीन हल्ले आम्ही सहन करणार नाही. असे त्यांनी या संदेशात म्हटले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीचीच संधी महत्वाची
पुढील बातमी
सालोशी येथील बांबू हस्तकला प्रशिक्षणाला उस्फूर्त प्रतिसाद

संबंधित बातम्या