कोल्हापूर : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करून इतिहास संशोधक इंग्रजीत सावंत यांना धमकावणाऱ्या प्रशांत कोरटकरला न्यायालयाने तीन दिवस पोलिस कोठडी सुनावली. तेलंगातून ताब्यात घेतल्यानंतर कोरटकरला घेऊन पोलिसांचे पथक आज, मंगळवारी सकाळी कोल्हापुरात पोचले. यानंतर त्याला न्यायालयात हजर केले असता २८ मार्च पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
प्रशांत कोरटकर याला जुना राजवाडा पोलिसांच्या पथकाने काल, सोमवारी दुपारी तेलंगणातून अटक केली. रात्रभर प्रवास करून आज, मंगळवारी सकाळच्या सुमारास पोलिसांचे पथक कोल्हापुरात पोहोचले. यावेळी जुना राजवाडा पोलीस ठाण्यासह कसबा बावडा येथील जिल्हा न्याय संकुलाबाहेर पोलिसांनी बंदोबस्त तैनात केला होता.
संतप्त शिवसैनिकांनी न्यायालय परिसरात गर्दी केली होती. त्यामुळे हल्ला होण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी बंदोबस्त वाढवून खबरदारी घेतली होती. पोलिसांनी सर्वांनाच चकवा देत लपून छपून कोरटकरला न्यायालयात हजर केले.