कोषवाङ्‌मय कोषाबाहेर आणण्यासाठी जागृती आवश्यक - डॉ. राजा दीक्षित यांचे प्रतिपादन; ‘मराठी कोषवाङ्‌मय आणि विस्ताराच्या दिशा’ या विषयावर परिसंवाद

by Team Satara Today | published on : 02 January 2026


सातारा  :  कोष हा केवळ माहितीचा साठा नसून ते विचारला आणि क्रांतीला चालना देतात. कोष वापरणे ही एक वृत्ती आणि शिस्त असते. ती एकदा लागली की कायम राहते. कोष कसा बघावा हे सुद्धा माहीत नसते. कोषविषयक जागृती आवश्यक आहे. कोष कपाटातून (कोषातून) बाहेर काढून लोकांपर्यंत पोहचवले पाहिजे," असे मत ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजा दीक्षित यांनी व्यक्त केले. 

९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ‘मराठी कोषवाङ्‌मय आणि विस्ताराच्या दिशा’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. यात डॉ. राजा दीक्षित, डॉ. साहेब खंदारे, डॉ. नीलिमा गुंडी, मांगिलाल राठोड, प्रमोद पाटील, अविनाश कोल्हे सहभागी झाले होते. जगतानंद भटकर यांनी त्यांच्याशी संवाद साधला. 

डॉ. राजा दीक्षित म्हणाले, कोषवाङ्‌मय यावर विद्यापीठांमध्ये  स्वतंत्र प्रबंध किंवा अभ्यासक्रम व्हायला हवेत. विश्वकोषाचा विचार सर्वप्रथम होतो. महाराष्ट्राबाहेरच्या महाराष्ट्राचा विचार व्हायला हवा. केवळ मराठी भाषेतच २५० ते ३०० कोष आहेत. मराठीत विपुल कोषवाङ्‌मय आहेत. कोषवाङ्‌मय कधी आणि का येते याचा विचार व्हायला हवा. १८-१९व्या शतकात म्हणजे प्रबोधन काळात जगभरात कोषवाङ्‌मय वाढले. मुद्रित कोषाच्या कोषातून बाहेर पडणे आवश्यक आहे. ज्ञानाचे लोकशाहीकरण हा कोषनिर्मितीचा उद्देश आहे. कोष म्हणजे फक्त माहितीची नोंद नाही. आदिवासी पाड्यापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत विश्वकोष पोहचवला पाहिजे.

कोष नवीन पिढीकडे कसे पोहचावे यविषयी बोलताना डॉ. दीक्षित म्हणाले, मुद्रित मध्यामातून डिजिटल माध्यमाकडे जाणे ही काळाची गरज असली तरी दोन्हींचा समन्वय साधणे आवश्यक आहे. ज्ञानाची अद्ययावतता वेगात करणे गरजेचे असून पायाभूत ज्ञान, परिवर्तनशील ज्ञान, संभाव्य ज्ञान अशा तिन्ही प्रकारचे ज्ञान डोक्यात ठेवत नवनवीन माध्यमांचा वापर होणे आवश्यक आहे. या संदर्भात काम करणाऱ्या संस्थांना सरकारने संपूर्ण स्वायत्तता द्यावी. शिस्त आणि गुणवत्ता यात तडजोड होऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली.


डॉ. नीलिमा गुंडी म्हणाल्या, कोषवाङ्‌मय आणि सूचीवाङ्‌मय यांचे नाव एकत्र घ्यायला हवे. ज्ञान आत्मसात करण्यासाठी कोषांची निर्मिती होऊ लागली. सूचीवाङ्‌मयात नेमकी माहिती असते. संक्षिप्त शब्दांचा कोष तसेच काही परिभाषांचा विचार करून त्याचा शब्दकोष करायला हवा. प्रसिद्ध व्यक्तिरेखांचा कोष करावा. लहान मुलांसाठी सचित्र शब्दकोष करायला हवा. शब्दकोष हा आपल्या पुढच्या पिढीला डोळ्यापुढे ठेवून करणे आवश्यक. शिवाय उच्चारण कोष करणे गरजेचे आहे. अचुकतेविषयी आस्था आणि ओढ वाटायला हवी. नव्या कोषांची सूची दरवर्षी व्हायला हवी. ज्ञानरंजक स्पर्धा घ्यायला हवी. 

मांगीलाल राठोड म्हणाले, कोष खूप आहेत पण ते लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. समाजाचे पुढारलेपण करणाऱ्यांना भाषेची जाण नाही. सामान्य व्यवहाराच्या भाषेची अवस्था वाईट आहे. शब्दांचे अपभ्रंश झाल्याने त्या शब्दांचा कार्याशी काय संबंध आहे हे आपण जाणत नाही. कोषात जे आहे ते व्यवहारात आणले तर बरेच काम करता येऊ शकते. 

डॉ. साहेब खंदारे म्हणाले, शब्दांकडे फार जपून बघायला हवे. राजव्यवहाराची भाषा सोपी व्हावी म्हणून कोष निर्माण करण्यात आले. कोषाची प्रणाली नव्या काळानुसार जुळवून घेता येईल अशा पद्धतीने करणे गरजेचे आहे. लोकभाषा, बोलीभाषा वेगळी आहे. प्रमाण भाषेचाही सार्थ कोष तयार होणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोषांचे ज्ञान वाढविण्यासाठी कोषांच्या माध्यमातून खेळ खेळायला शिकवले पाहिजे. कोषांची निर्मिती सामाजिक, सांस्कृतिक मापदंडावर होणे आवश्यक आहे. 

प्रमोद पाटील म्हणाले, इतर कोणत्याही भाषेपेक्षा मराठी भाषेत इंग्रजीचे आक्रमण वाढत आहे. अनेक मराठी पुस्तकांची नावे इंग्रजी आहेत. आजचे वातावरण हे मराठीच्या ऱ्हासासाठी जबाबदार आहे. डिजिटल मीडियामध्ये कोषांचे काम मोठ्या प्रमाणात होणे आवश्यक आहे.

अविनाश कोल्हे म्हणाले, शब्द, ज्ञान यांचा सुव्यवस्थित पद्धतीने केलेला संचय म्हणजे कोष. कोषांमध्ये राष्ट्रवादी दृष्टीकोन येतो. त्यातून वाद होतात. नव्या काळाशी जुळवून घेत मुलांपर्यंत कसे पोहचावे याचा विचार करावा. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ग्रामीण भागातील मुले मराठीत लिहिती होत आहेत ही आनंदाची बाब : डॉ. तारा भवाळकर; तपोवनावर कुऱ्हाड चालणार नाही याची काळजी घ्या
पुढील बातमी
आगामी निवडणुकीच्या दृष्टीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेची राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत आज महत्त्वपूर्ण बैठक

संबंधित बातम्या