कराड : ग्रामदैवत श्री अकलाई देवीच्या देवस्थानाला ‘ब’ वर्ग तीर्थस्थळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. या तीर्थस्थळ दर्जामुळे धार्मिक पर्यटनास चालना मिळून शेणोलीसह परिसराच्या आर्थिक व सामाजिक विकासाला बळकटी मिळण्यास मदत होईल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांनी केले.
शेणोली (ता. कराड) येथे विविध विकासकामांच्या भूमिपूजन व उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. शेणोली येथे आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या 50 लाखांच्या निधीतून शेणोली ते आकलाई देवी रस्ता सुधारणेचे काम पूर्ण झाले आहे. तसेच 10 लाखांच्या निधीतून मुस्लिम दफनभूमी आवारात काँक्रीट रस्त्याचे काम करण्यात आले आहे. या विकासकामांचे उद्घाटन, तसेच अकलाई देवी मंदिर आवारात पेव्हिंग ब्लॉक बसवणे (7 लाख) आणि गाव ओढ्यात संरक्षक भिंत बांधणे (10 लाख) या विकासकामांचे भूमिपूजन आ.डॉ. भोसले यांच्या हस्ते करण्यात आले.
आमदार डॉ. भोसले म्हणाले, भाजपा-महायुतीचे सरकार कराड दक्षिणच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी देण्यासाठी प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आपल्या मतदारसंघाकडे विशेष लक्ष आहे. निवडणुकीनंतर अवघ्या सहा महिन्यांत कराड दक्षिणमधील अनेक महत्त्वाच्या कामांसाठी कोट्यवधींचा निधी मिळवण्यात यश आले आहे. त्यामध्ये विशेषतः कराड येथील ब्रिटिशकालीन जुन्या पुलासाठी 50 कोटींचा निधी, पंचायत समितीच्या नवीन इमारतीसाठी 15 कोटींचा निधी मंजूर झाला आहे.
कराड दक्षिणमधील काही ग्रामपंचायतींच्या इमारत उभारणीसाठी सुद्धा निधी मंजूर झाला आहे. याच योजनेंतर्गत येत्या काळात शेणोली ग्रामपंचायतीची इमारत सुसज्ज करण्याचा माझा प्रयत्न राहील. तसेच गावात दर्जेदार व्यायामशाळा (जीम) साकारण्यासाठी क्रीडा विभागाकडे पाठपुरावा केला जाईल. गावाच्या प्रगतीसाठी आपण सर्वांनी एकत्र यावे. आपल्या सर्वांच्या सहकार्याच्या माध्यमातून शेणोलीला एक विकसित गाव बनवूया, असे आवाहनही आमदार अतुलबाबांनी उपस्थित ग्रामस्थांना केले. कार्यक्रमाला भाजपाचे राज्य परिषद सदस्य संजय पवार, कृष्णा सहकारी बँकेचे संचालक नारायण शिंगाडे, उपसरपंच इकबाल मुल्ला, माजी उपसरपंच सुधीर बनसोडे, तंटामुक्ती अध्यक्ष माणिकराव कणसे, उपाध्यक्ष सागर कणसे, डॉ. संदीप पाटील, उमेश कणसे, डॉ. रमेश कणसे, युनूस मुल्ला, संभाजी निकम, पैलवान राहुल निकम, लालासो पवार, वसीम मुल्ला यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शेणोली येथील प्रियांका अविनाश जाधव या अंध मुलीची नुकतीच महसूल सहाय्यकपदी निवड झाली आहे. याबद्दल आमदार डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या हस्ते तिचा विशेष सत्कार करण्यात आला. प्रियांका जाधव यांची यशोगाथा युवक-युवतींसाठी अधिक प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार आ.डॉ. भोसले यांनी यावेळी काढले.