सह्याद्रीच्या लेकींची आंतरराष्ट्रीय स्तरावर गगनभरारी

by Team Satara Today | published on : 04 October 2025


सातारा : साताऱ्याची भूमी ही केवळ नररत्नांचीच नव्हे, तर नारीशक्तीच्या कर्तृत्वाची खाण आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत या मातीत घडलेल्या खेळाडूंनी जिद्द, मेहनत अन् चिकाटीच्या बळावर हिमालयाएवढी उंची गाठली आहे. गिर्यारोहणापासून ते ॲथलेटिक्सपर्यंत विविध क्षेत्रांत सीमोल्लंघन करत या ‘सह्याद्रीच्या लेकींनी’ जिल्ह्याचे आणि देशाचे नाव सातासमुद्रापार पोहोचवले आहे. जिथे जिद्द आहे, तिथे उंचीला मर्यादा नसते हे साध्य करतानाच तरुणांपुढे आदर्श ही उभा केला आहे.

गिर्यारोहण क्षेत्रात प्रियांका मोहिते हे नाव आता साताऱ्याच्या शिरपेचातील मानाचा तुरा बनले आहे. जगातील सर्वांत उंच शिखरे पादाक्रांत करण्याचा तिचा प्रवास थक्क करणारा आहे. नुकताच तिने घटस्थापनेच्या शुभदिनी जगातील आठव्या क्रमांकाचे माऊंट मनास्लू हे शिखर सर केले. प्रियांकाने यापूर्वी एव्हरेस्ट, कांचनगंगा, लोहत्से, मकालू आणि अन्नपूर्णा यांसारख्या महाकाय शिखरांवर देशाचा तिरंगा डौलाने फडकवला आहे. आता नेपाळमधील धौलागिरी, चीनमधील ओयू आणि तिबेटमधील शिशापांगमा ही शिखरे सर करण्याचे आव्हान तिने स्वीकारले आहे.

जावळी तालुक्यातील खर्शी या छोट्या गावातून आलेल्या सुदेष्णा शिवणकरने ॲथलेटिक्समध्ये इतिहास रचला आहे. २०१८ ते २०२५ या काळात तिने राष्ट्रीय पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये तब्बल ६२ पदके मिळवली आहेत. उत्तराखंड-डेहराडून येथे झालेल्या ३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तीने १०० मीटर धावणे या क्रीडा प्रकारात विक्रमी वेळ नोंदवत ‘देशाची वेगवान धावपटू’ हा किताब पटकावला. आता तिचे डोळे २०२८ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याकडे आणि मायदेशासाठी पदक मिळवण्याकडे लागले आहेत.

साताऱ्यात राहणारी धैर्या विनोद कुलकर्णी ही अवघ्या तेरा वर्षांची मुलगी. तीच्या प्रबळ इच्छाशक्तीपुढे आता आकाशही ठेंगणे वाटू लागले आहे. साताऱ्याच्या डोंगर, दऱ्यांत बागडणाऱ्या या धैर्याने एप्रिल २०२४ मध्ये १७ हजार ५०० फूट उंच एवरेस्ट शिखर सर केले. त्यानंतर तिने ऑक्टोबर २०२४ मध्ये आर्फिकेतील सर्वोच्च किलीमांजारो पादाक्रांत केले. यानंतर नुकतेच तिने युरोप खंडातील माउंट एल्ब्रुस हे शिखर सर करुन जिद्द अन् धैर्य यांचा मिलाफ झाल्यानंतर काय होऊ शकते, हे सिद्ध करताना साताऱ्याचे नाव अकटेपार पोहोचविले आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
रहिमतपूरातील कामे सुरु न झाल्यास आणखी तीव्र आंदोलन छेडले जाईल : आ. शशिकांत शिंदे
पुढील बातमी
दुचाकी वाहनांसाठी एम एच ५३ डी नवीन मालिका सुरु

संबंधित बातम्या