सातारा : प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा अध्यक्षा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा सुरेखा कोसमकर यांचे मार्गदर्शनानुसार व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण उच्च न्यायालय, मुंबई यांचे आदेशान्वये जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व संग्राम संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने दि. १८ जुलै रोजी वाजता जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा येथील सभागृहात बुध्ददेव कर्मरकर वि. पश्चिम बंगाल राज्य या प्रकरणात मा. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार लैंगिक कामाच्या कायदेशीरतेसह त्यांचे हक्क, पोलीसांचे अधिकार आणि कर्तव्य तसेच कायद्यानुसार काय परवानगी आहे याबद्दल लैंगिक कामगारांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
निना नि. बेदरकर, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा, यांनी बुध्ददेव कर्मरकर वि. पश्चिम बंगाल राज्य या न्यायनिर्णयाबाबत माहिती दिली. वेश्या एड्स मुकाबला परिषदेच्या माया गुरव व संगीता यांनी संग्राम व्हॉप व मुस्कान संस्था मानव तस्कारीच्या विरोधात काम करत आहेत असे सांगितले. त्यानंतर किरण देशमुख यांनी मुलांच्या येणा-या अडचणी व लैंगिक कामगारांच्या मुलांचे जातीचे दाखल्याचे प्रश्न उपस्थित केले. संग्राम संस्थेचे रजाक शेख यांनी कायदेविषयक माहिती घेत असताना पोलीस प्रशासनाला सोबत घेतले पाहिजे, आणि कायदेविषयक लैंगिक कामगारांचे काय अधिकार आहेत याची प्रशासनालाही माहिती व्हावी व त्यानुसार अंमलबजावणी व्हावी असे सांगितले. मुस्कान व प्रशांत वारकरी यांनी कायदेविषयक माहिती मिळाली त्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सातारा या कार्यालयाचे आभार मानले.