सैफ अली खानला मंगळवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून तो आता घरीच विश्रांती घेत आहे. सैफवर हल्ला झाला तेव्हा त्याचा ड्रायव्हर घरी नव्हता आणि तो रिक्षातून हॉस्पिटलमध्ये गेला होता. सैफ बरा झाल्यानंतर रिक्षाचालकाला भेटून त्याची गळाभेट घेतली तसेच त्याला सुरक्षित रुग्णालयात पोहोचवल्याबद्दल त्याचे आभारही मानले. भजनसिंग राणा असे रिक्षा चालकाचे नाव आहे. आता ड्रायव्हरने सांगितले की, सैफने त्याला काय सांगितले तसेच अभिनेत्याने रिक्षा चालकाला किती पैसे दिले आहेत, याचेही अपडेट समोर आले आहेत.
सैफ अली खानने आपल्याला लवकर आणि सुरक्षित रुग्णालयात नेल्याबद्दल भजन सिंग राणाचे आभार मानले, तसंच त्याची गळाभेटही घेतली. सैफने तुला घरी आल्यानंतर काही पैसे दिले का? असं विचारलं असता ते म्हणाले की, "ते त्यांनाच माहित. मी त्यावर बोलू शकत नाही. माझी काही मागणी नाही. जे त्यांना योग्य वाटेल ते त्यांनी द्याव. त्याने जे दिलं ते मी घेतलं"सैफने तुला काय सांगितलं असं विचारलं असता भजन सिंग म्हणाले की, "त्याने मला सांगितलं की, तू मला वेळेत रुग्णालयात पोहोचवलंस. मी आभारी आहे".
त्याचबरोबर सैफने रिक्षाचालकाला ५० हजार रुपये दिल्याचेही वृत्तात म्हटले आहे. तत्पूर्वी, रिक्षाचालकाने त्या रात्रीबद्दल सांगितले होते की, तो वाटेत जात असताना कोणीतरी फोन करून मदतीसाठी हाक मारली. सैफसोबत एक मुलगा आणि एक पुरुष होता. रिक्षात बसताच सैफने किती वेळ लागेल असे विचारले आणि ड्रायव्हरने ८-१० मिनिटे सांगितली.
ड्रायव्हरने असेही सांगितले की, सैफला खूप रक्तस्त्राव होत होता आणि त्याचा पांढऱ्या रंगाचा कुर्ता-पायजमा रक्ताने माखला होता. त्यावेळी त्याने सैफकडून पैसेही घेतले नव्हते. सैफने त्याला भेटल्यानंतर आता रिक्षाचालकाचे आभार मानले आहेत. या दोघांचे एकत्र फोटोही सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. रिक्षा लीलावती रुग्णालयासमोर पोहोचल्यानंतर 'स्ट्रेचर घेऊन ये, मी सैफ अली खान आहे' असे म्हटल्यानंतर रिक्षाचालकाला अभिनेत्याची ओळख पटली होती.