सातारा : सातारा नगरपरिषदेने घरपट्टी थकबाकी वसुलीसाठी धडाकेबाज मोहीम सुरू केली असून थकबाकीदारांवर कठोर कारवाई केली जात आहे. घरपट्टी न भरलेल्या मालमत्तांवर नळ कनेक्शन बंद करणे, तसेच जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. या मोहिमेसाठी वॉरंट ऑफिसर व विशेष पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या कारवाईअंतर्गत चिमणपुरा येथील राजेंद्र महेंद्रकर (मालमत्ता क्र. १५२, चिमणपुरा पेठ) यांची घरपट्टी थकबाकी ९१ हजार ३८४ रुपये असल्याने त्यांचा फ्लॅट सील करण्यात आला. तसेच व्यंकटपुरा पेठेतील सि.स. नं. ९८, प्रसन्न रेसिडेन्सी, फ्लॅट क्रमांक S-5 येथील सुभाष बाळू गिरी यांच्यावर ७२ हजार ४८७ रुपये थकबाकी असल्याने त्यांचा फ्लॅटही सील करण्यात आला. याशिवाय रामाचा गोट पेठेतील सि.स. नं. ७७, जान्हवी अपार्टमेंटमधील श्रीरंग गोविंद कदम यांच्यावर ६४ हजार ५०५ रुपये इतकी थकबाकी असल्याने संबंधित फ्लॅटवर सील करण्याची कारवाई करण्यात आली.
मुख्याधिकारी विनोद जळक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. या मोहिमेत करप्रमुख उमेश महादर, भाग लिपिक मिलिंद सहस्त्रबुद्धे, शिपाई तेजस साखरे, उत्तम खवळे आणि वॉरंट ऑफिसर विनोद दहिफळे यांनी सहभाग घेतला. नगरपरिषदेने थकबाकीदारांनी तातडीने घरपट्टी भरून सहकार्य करावे, अन्यथा पुढील काळातही अशीच कठोर कारवाई सुरू राहील, असा इशाराही दिला आहे.