शाळेत जाताना लहानग्यांच्या अंगावर कोसळले झाड

चिखली येथील घटना; चार मुले जखमी

by Team Satara Today | published on : 19 August 2025


सातारा : चिखली, ता. सातारा येथे आज शाळेत निघालेल्या लहानग्यांच्या अंगावर झाड कोसळल्याने चार शालेय मुले जखमी झाली आहेत. त्यांना तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून एकाचा हात थोडा मोडला असून उर्वरित तीन जणांच्या खांद्याला तसेच खुब्याला मुकामार लागला आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, आज दि. 19 रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास सातारा तालुक्यातील ठोसेघर, चिखली येथील आयुष विकास बोरगे इयत्ता 7 वी, वय 12, आर्यन चंद्रकांत शिर्के इयत्ता 5 वी, वय 11, समर्थ दीपक शिर्के इयत्ता पहिली वय 6, जय संपत शिर्के इयत्ता सातवी वय 12 ही शालेय मुलेे नेहमीप्रमाणे चिखली येथील जिल्हा परिषद शाळेत जाण्यासाठी निघाली होती. शाळेपासून जवळपास 200 मीटर अंतरावर असताना अचानक रस्त्याकडेला असणारे उंबराचे झाड या विद्यार्थ्यांच्या अंगावर कोसळले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

स्थानिकांनी या मुलांना बाहेर काढून उपचारासाठी सातार्‍यात क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. यातील आर्यन चंद्रकांत शिर्के या विद्यार्थ्याचा हात थोडा मोडला असून झाड अंगावर आल्याने सर्वांच्या खांद्याला आणि खुब्याला मुकामार लागला आहे. तहसिलदार, सर्कल यांना या घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी पोहचले आहेत.

याबाबत बोलताना स्थानिकांनी सांगितले, चिखली याठिकाणी संरक्षक भिंत बांधण्याचे काम सुरु आहे. त्यासाठी चर काढल्यामुळे झाडांच्या मुळ्या उघड्यावर पडल्या आहेत. त्यातूनच ही दुर्घटना घडल्याची शक्यता आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कॉ. शेख काका व डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रा. डॉ. नीरज हातेकर यांचे दि २० रोजी व्याख्यान
पुढील बातमी
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी रिक्षा चालकावर गुन्हा

संबंधित बातम्या