सातारा : राज्य शासनाच्या शंभर दिवस प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक कार्यालय साताराने प्रथम क्रमांक पटकावत मानाचे स्थान प्राप्त केले आहे. नुकतेच क्षेत्र व्यवस्थापक कार्यालयातून सुरु झालेले प्रादेशिक कार्यालयाने या उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवून नागरिकांचे जीवनमान सुकर करण्याच्या दृष्टीने काम केले.
प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत प्रादेशिक कार्यालयाची स्वच्छ व सुंदर इमारत, हिरकणी कक्ष, महिला आराम कक्ष सारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. महामंडळाबद्दल माहिती तसेच इतर माहितीसाठी स्वतंत्र संकेत स्थळ उद्यमायक विकसित करून त्यावर सर्व माहितीचे अद्ययावतीकरण करत ती सर्वसामान्य जनतेस खुली केली. उद्योजकांना भूखंड मागणी, हस्तांतरण, एकत्रिकरण यासारख्या कामकाजा दरम्यान अडथळा आल्यास प्रादेशिक कार्यालय निशुल्क मार्गदर्शन करत आहे. उद्योजक, गुंतवणूकदार यांना सुविधा देत आहे. यासाठी प्रादेशिक अधिकारी डॉ. अमितकुमार सांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्र व्यवस्थापक सौ. मायादेवी भोसले, संतोष जाधव, श्रीमती अमृता लांडगे, सचिन हेंद्रे. सतीश शिंदे, अक्षय गरुड, अमोल कांबळे, विशाल तोरणे आदींनी प्रयत्न केले.