दिव्यांग बांधवांनी पुढाकार घेत वाहिली स्व. यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली; प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या अनास्थेबाबत संताप

by Team Satara Today | published on : 25 November 2026


सातारा : महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीदिनी सातारा शहरात एक संतापजनक आणि तितकीच संवेदनशील घटना समोर आली आहे. ज्या महान नेत्याने आपल्या कार्यातून महाराष्ट्राला देशात वेगळी ओळख मिळवून दिली, त्यांच्याच गृहजिल्ह्यात म्हणजेच साताऱ्यातील पोवई नाका येथील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्याचे भान प्रशासकीय अधिकाऱ्यांना, राजकीय नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींना राहिले नाही. या सर्व प्रकारामुळे सातारकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात असतानाच, दिव्यांग बांधवांनी पुढाकार घेत स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांना आदरांजली वाहून आपली सामाजिक बांधिलकी जपली आहे.
पुण्यतिथीच्या निमित्ताने दिवसभर पोवई नाका परिसरात प्रशासकीय पातळीवर किंवा कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांकडून चव्हाण साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी कोणीही फिरकले नाही. जबाबदार अधिकारी आणि लोकप्रतिनिधींच्या या अनास्थेची माहिती दिव्यांग प्रेरणा सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मिळताच त्यांनी तात्काळ पोवई नाका येथे धाव घेतली. स्वतः शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असूनही, या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहाने आणि आदराने स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला आणि विनम्र अभिवादन केले.
या प्रसंगी दिव्यांग प्रेरणा सामाजिक संघटनेचे अध्यक्ष अजय पवार यांच्यासह अमोल निकम, पांडुरंग शेलार, शैलेंद्र बोर्डे, नामदेव इंगळे आणि प्रशांत बगले हे पदाधिकारी उपस्थित होते. एकीकडे सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासकीय यंत्रणा यांना आपल्याच लाडक्या नेत्याच्या स्मृतिदिनाचा विसर पडलेला असताना, दुसरीकडे दिव्यांग बांधवांनी दाखवलेली ही तत्परता आणि कृतज्ञता सध्या संपूर्ण सातारा जिल्ह्यात कौतुकाचा विषय ठरली आहे. मात्र, जबाबदार घटकांनी दाखवलेल्या या उदासीनतेबाबत सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दक्षिण काशी संगम माहुली येथे त्रिपुरारी पौर्णिमेचा भव्य दीपोत्सव; हजारो दिव्यांच्या प्रकाशाने उजळला कृष्णा-वेण्णा नदीकाठ
पुढील बातमी
यशवंत विचारांच्या जिल्ह्यातच 'यशवंतरावां'चा विसर? पुण्यतिथीदिनी पोवई नाका येथील पुतळा हार-फुलांविनाच; नागरिकांमधून तीव्र संताप

संबंधित बातम्या