वाई : वाईच्या सर्वांगीण विकासासाठी शिवसेना (एकनाथ शिंदे गट) नगरपरिषदेच्या निवडणुकीत उतरली असून ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या ब्रीदवाक्याने काम करण्याचा संकल्प पक्षाने यावेळी व्यक्त केला. वाई नगरपरिषदेच्या निवडणुकीनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विकास शिंदे यांनी ही माहिती दिली.
यावेळी सातारा जिल्हा उपसंघटक याेगेश फाळके, विधानसभा प्रमुख प्रताप भिलारे, तालुका प्रमुख रविंद्र भिलारे, शहर प्रमुख गणेश सावंत, युवा सेना शहर प्रमुख किशाेर भगत, तालुका संघटक युवराज कोंढाळकर, गटप्रमुख नितीन चोरट, सोपान चिकणे, दत्ता पोळ आदी शिवसेना पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
विकास शिंदे म्हणाले,“शिवसेनेने भाजपशी युती करण्यासाठी प्रयत्न केले; मात्र हवा तसा प्रतिसाद न मिळाल्याने आम्ही स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. सर्वसामान्य घरातील उमेदवारांना संधी देऊन त्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न आहे.” सत्ताधाऱ्यांनी जनतेला विकासाचे गाजर दाखवून फसवले असल्याचा आरोप करत शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा, नाना-नानी पार्क, फुलेनगर ते शहर जोडणारा किवरा ओढ्यावरचा पूल, कृष्णा नदी शुद्धीकरण प्रकल्पनाट्यगृहाचा निधी ही सर्व कामे वर्षानुवर्षे रखडली असल्याचा दावा त्यांनी केला.
नगराध्यक्षपदाचे उमेदवार प्रवीण शिंदे म्हणाले, इतिहास, सांस्कृतिक वारसा आणि मूलभूत सुविधा यांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले. गेल्या अनेक वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी वाईकर जनतेला विकासाच्या नावाखाली वेठीस धरल्याची टीकाही त्यांनी केली. ऐतिहासिक स्थळांचे सुशोभीकरण, घाटांचे संवर्धन, स्वच्छ वायू आणि सुंदर वाई यासाठी ठोस पावले उचलली जाणार आहेत.
शिवसेनेने वाईसाठी कोट्यवधींचा निधी आणला
जिल्हा नियोजन फंडातून २ कोटी १२ लाख रुपये, नगर विकास खात्यातून ५ कोटी रुपये घनकचरा व्यवस्थापनासाठी, अशुद्ध पाणी शुद्धीकरणासाठी २२ कोटी रुपयांची एसटीपी योजना, किवरा ओढ्यावर बंधारा बांधण्यासाठी ३ कोटी रुपये असा महत्त्वाचा निधी वाईसाठी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय शहरासाठी कार्डिओलॉजी हॉस्पिटल (१०० खाटांचे), नाट्यगृहासाठी परत गेलेला साडेतीन कोटींचा निधी परत मिळविणे, पार्किंगचा प्रश्न, वाहतूक कोंडी, भाजी मंडईचा रखडलेला प्रकल्प यासह अनेक प्रलंबित कामे शिवसेनेच्या माध्यमातून मार्गी लावण्याचा संकल्प विकास शिंदे यांनी व्यक्त केला.