सध्या मराठी इंडस्ट्रीमध्ये वेगवेगळ्या विषयावर आधारित चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याचे दिसत आहे. तसेच वेगवेगळ्या कलाकारांच्या जोड्या देखील पाहायला मिळत आहेत. लवकरच अभिनेत्री सई ताम्हणकर आणि समीर चौघुले हे एकत्र दिसणार आहेत. त्यांच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘गुलकंद’ आहे. या चित्रपटाची नुकताच घोषणा करण्यात आली आहे.
‘गुलकंद’ हा मुरलेल्या प्रेमाचा गोडवा चाखवणारा चित्रपट असणार आहे. नुकतीच या चित्रपटाची सोशल माडियाद्वारे घोषणा करण्यात आली आहे. सचिन मोटे लिखित, सचिन गोस्वामी दिग्दर्शित या चित्रपटात फॅमिली एंटरटेनमेंट आणि कॅामेडीचे अनोखे कॅाम्बिनेशन पाहायला मिळणार आहे. यात सई ताम्हणकर, समीर चौघुले, ईशा डे, प्रसाद ओक, वनिता खरात, मंदार मांडवकर, जुई भागवत, तेजस राऊत, शार्विल आगटे अशी तगडी स्टारकास्ट असणार आहे. ‘गुलकंद’चे सचिन गोस्वामी, सचिन मोटे आणि संजय छाब्रिया निर्माते आहेत.
‘गुलकंद’ चित्रपटाचे दिग्दर्शन सचिन गोस्वामी यांनी केले आहे. आता चित्रपटात काय पाहायला मिळणार याविषयी त्यांनी माहिती दिली आहे. "या सगळ्यांसोबत मी आधी काम केलं असल्याने आमच्यात एक बॅाण्डिंग आहे आणि आमची हिच केमिस्ट्री यातही प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट एक फॅमिली एंटरटेनर असून प्रेक्षकांना या मुरलेल्या गुलकंदाची चव चाखायला नक्कीच आवडेल. ही एक अशी कथा आहे, ज्याची लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मजा घेऊ शकतात. ही अतिशय हृदयस्पर्शी कहाणी आहे" असे सचिन म्हणाले.