मुंबई : अतिवृष्टीमुळे अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेतील विशेष फेरी-१ साठी प्रवेश निश्चित करण्याची मुदत वाढविली आहे. आता विद्यार्थ्यांना ७ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहे.
राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी एकूण २२ लाख २० हजार ४२६ जागा उपलब्ध असून त्यापैकी आतापर्यंत ९ लाख ७५ हजार १४५ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अजूनही १२ लाख ४५ हजार २८१ जागा रिक्त आहेत.
कॅपअंतर्गत १८ लाख ५० हजार ८५८ जागांपैकी ८ लाख ३८ हजार ६०६ प्रवेश झाले असून १० लाख १२ हजार २५२ जागा रिक्त आहेत. तर विविध कोट्यांतील ३ लाख ६९ हजार ५६८ जागांपैकी १ लाख ३६ हजार ५३९ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून २ लाख ३३ हजार २९ जागा अद्याप रिक्त आहेत. शून्य फेरी त्यानंतर तीन नियमित फेरी झाल्यानंतर आता विशेष फेरी राज्यभरात सुरु आहे.
अतिवृष्टीमुळे अनेक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांना सुटी जाहीर करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना कागदपत्र पडताळणी आणि प्रवेश प्रक्रिया पूर्ण करण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी प्रवेश निश्चितीची मुदत वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
शिक्षण संचालनालयाने शनिवारी याबाबत सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. या पहिल्या विशेष फेरीसाठी ४ लाख ८४ हजार ८६५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले असून त्यापैकी ३ लाख ९२ हजार ६९३ विद्यार्थ्यांना महाविद्यालयांचे अलॉटमेंट देण्यात आले आहे. यापैकी आतापर्यंत १ लाख ९७ हजार ३८१ विद्यार्थ्यांनी प्रवेश गेल्या दोन दिवसात महाविद्यालयात जावून निश्चित केला असून, त्यात १ लाख ८९ हजार ६५९ कॅप प्रवेश आणि ७ हजार ७२२ कोटा प्रवेश आहेत.
विभागनिहाय प्रवेशस्थिती
विभाग - अलॉटमेंट - प्रवेश
अमरावती -३१,३६० - १७,२२२
छ. संभाजीनगर- ४४,९३९ -२३,७६२
कोल्हापूर - ४७,४३५ - २४,७१२
लातूर - २३,७०३- १३,७२५
मुंबई- ९०,०३६ -३३,७१४
नागपूर -३४,५३६ -२३,३७५
नाशिक -४३,२१८ -२२,९१५
पुणे - ७७,४६६ - ३७,९५६
एकूण प्रवेश- ३,९२,६९३ - १,९७,३८१