सातारा : गणेशोत्सवासाठी लागू करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन केले. याप्रकरणी पोलिसांनी स्वप्नील भोसले रा. कोडोली सातारा या लाईट मालकावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ही घटना दि. २३ रोजी रात्री ९.३0 वाजता घडली. पोलीस अधिक्षक तुषार दोशी यांनी गणेशोत्सव काळात प्लाझ्मा, बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरास मनाई करणारे आदेश दिले होते. त्यानुसार ही कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत सातारा शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शनिवार, दि. २३ ऑगस्ट रोजी रात्री ९.३० च्या सुमारास सातारा शहर पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाचे पोलीस कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना, त्यांना कमानी हौद, सातारा येथे 'श्री साई गणेश सांस्कृतिक कला व क्रीडा मंडळ' समोर अजिंक्य लाईटचे मालक स्वप्नील भोसले यांनी प्रतिबंध असूनही बीम लाईट वापरल्याचे आढळून आले. त्यावेळी मंडळाचे पदाधिकारी यांना पोलिसांनी सांगितले की, सदरच्या पांढऱ्या लाईटचा मोठ्या प्रमाणात प्रकाश पडला जात आहे. तो नागरिकांच्या डोळ्यांना घातक आहे, असे सांगताच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी ही मिरवणुक आता पोलिसांनीच पुढे न्यावे असा पवित्रा घेतल्यामुळे काही वेळ ताण तणाव निर्माण झाला होता.
दरम्यान, त्यानंतर पोलिसांनी काही वेळ तटस्थपणाची भूमिका घेत. मिरवणूक पुढे जावू लागल्यानंतर संबंधित लेझर लाईटचे मालक स्वप्नील भोसले यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता कलम २२३ नुसार गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे आता सातारा शहरातील लेझर लाईट मालकांचे धाबे दणाणले गेले आहेत. याबाबतचा अधिक तपास पोलीस हवालार विश्वनाथ मेचकर हे करत आहेत.