सातारा : सातारा तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 च्या पार्श्वभूमीवर निवडणूक आचारसंहितेच्या अंमलबजावणीसाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने काल (दि. 27 जानेवारी 2026) सायंकाळी 4.30 ते 7.15 या वेळेत व्यापक बंदोबस्त व सराव कार्यक्रम राबविण्यात आला.
यावेळी सातारा तालुका पोलीस ठाणे येथे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले यांनी बंदोबस्तावरील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदारांना निवडणूक आचारसंहिता अनुषंगाने ब्रिफिंग करून आवश्यक सूचना दिल्या.
यानंतर मौजे वडूथ येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये जातीय दंगा काबू योजना (Riot Control) सराव घेण्यात आला. त्यानंतर मौजे वडूथ गावात तसेच मौजे वाढे (ता. जि. सातारा) येथे नागरिकांमध्ये सुरक्षिततेचा संदेश देण्यासाठी पोलीस रूट मार्च काढण्यात आला.
या कारवाईदरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. राजीव नवले, सातारा शहर पोलीस ठाण्याचे श्री. राजेंद्र मस्के, वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. यादव, पोलीस निरीक्षक मोरडे, सातारा तालुका पोलीस ठाण्याचे श्री. काटकर, निवासी तहसीलदार श्री. दत्तात्रय शिंदे, वरिष्ठ लिपिक श्री. तुषार पोळ यांच्यासह आरोग्य विभाग व अग्निशामक दलाचे अधिकारी उपस्थित होते.
सदर उपक्रमात एकूण 11 अधिकारी, 47 पोलीस अंमलदार, 1 आरसीपी पथक व 7 शासकीय वाहने सहभागी झाली होती. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चमधून देण्यात आला.