एसटी महामंडळात भाडेवाढ होण्याची शक्यता

by Team Satara Today | published on : 19 December 2024


नागपूर : नव्या वर्षात राज्यातील रस्त्यांवर 3500 नव्या साध्या लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल करण्यात येणार असल्याचे एसटी महामंडळाचे अध्यक्ष व मंत्री भरत गोगावले यांनी नमूद केले. याशिवाय एसटीची 14.95 टक्के भाडेवाढ राज्य सरकारकडे प्रस्तावित करण्यात आल्याचे नमूद करीत त्यांनी चाकरमान्यांच्या खिशाला भुर्दंडाचेही संकेत पत्रकार परिषदेतून दिले.

सध्या एसटीच्या ताफ्यामध्ये 14 हजार बसेस असून कोरोनापूर्वी तब्बल १८ हजार बसेस होत्या. परंतु गेल्या तीन चार वर्षात कोरोना महामारी व इतर काही कारणामुळे एसटीला नव्या बसेस खरेदी करणे शक्य झाले नाही. अनेक बसेस जुन्या झाल्यामुळे त्या नादुरुस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे एसटीने स्वमालकीच्या 2200 बसेस खरेदी करण्याचा व 1300 बसेस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर व सर्व खात्याचे प्रमुख उपस्थित होते.

मागील सरकारच्या काळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकाऱ्यांने राज्यभरातील 183 बस स्थानक परिसराचे काँक्रिटीकरण करण्यास सुरुवात झाली होती. त्याला आता वेग आला असून, नागपूरमधील गणेशपेठ बसस्थानकाचे काँक्रिटीकरण देखील याच टप्प्यात पूर्ण होत आहे. भविष्यात विदर्भातील एक देखणे बस स्थानक म्हणून गणेशपेठ बसस्थानकाचा नावलौकिक होईल, असा विश्वास गोगवले यांनी व्यक्त केला.

राज्यातील एसटीला ऐन दिवाळीत मोठा धनलाभ झाला आहे. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नाचा नवा विक्रम झाला आहे. अशातच दिवाळी सणाच्या निमित्ताने प्रवाशांचा चढ-उतार वाढल्यामुळे तब्बल ९४१ कोटी रुपये इतके यंदाच्या वर्षातील सर्वाधिक उत्पन्न नोव्हेंबर महिन्यात एसटी महामंडळाला मिळाले आहे. या महिन्यात एसटीने दररोज सरासरी ६० लाख प्रवाशांची वाहतूक करून सुमारे ३१.३६ कोटी रुपये उत्पन्न प्रतिदीन प्राप्त केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ऊस दराच्या संदर्भात साखर कारखान्यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना
पुढील बातमी
कांद्याच्या दरात घसरण

संबंधित बातम्या