सातारा : बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयात शनिवारी (दि. २० जानेवारी २०२६) सायंकाळी दाखल करण्यात आलेल्या १८ वर्षीय तरुणीचा शनिवारी (दि.१४) रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाला.
गर्भपातादरम्यान झालेल्या अति रक्तस्रावामुळे व त्यानंतर रक्त संक्रमण झाल्याने मृत्यू झाल्याचे ॲडव्हान्स प्रमाणपत्रात नमूद करण्यात आले आहे. मनिषा अनिल वाघमारे (वय १८, रा. साखरवाडी, ता. फलटण, जि. सातारा) असे या घटनेतील तरुणीचे नाव आहे. याबाबतची खबर डॉ. दळवी यांनी बारामती उपजिल्हा रुग्णालयातून दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणी दि. २० जानेवारीला फलटण येथील काम आटोपून आपल्या गावी जात असताना तिला अति रक्तस्राव होत असल्याने तातडीने बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयात सायंकाळी सुमारे ६.१५ वाजता उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना तिची प्रकृती खालावली आणि शनिवारी दि. १४ फेब्रुवारीला तिचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.
सदर तरुणी कातकरी समाजातील असून अशिक्षित व ग्रामीण भागातील असल्याने तिला डॉक्टरांना सविस्तर माहिती देता आली नसल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे मारहाणीबाबत वैद्यकीय कायदेशीर अहवाल (एमएलसी) कळविला होता. मृतदेहाचा पंचनामा व शवविच्छेदन करण्यात आले असून पंचनाम्याच्या ॲडव्हान्स प्रमाणपत्रात गर्भपातातील अति रक्तस्राव व रक्त संक्रमणामुळे मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. घटनेची नोंद फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन येथे करण्यात आली असून पोलीस हवालदार खाडे पुढील तपास करत आहेत.