वाढलेल्या बीपीकडं चुकूनही दूर्लक्ष करू नका

हृदयासाठीच नाही तर किडनीही निकामी करेल

by Team Satara Today | published on : 14 May 2025


उच्च रक्तदाबाचा परिणाम हा केवळ हृदयावरच होत नाही तर मूत्रपिंडांचे यामुळे नुकसान होऊ शकते. उच्च रक्तदाबामुळे तुमच्या मूत्रपिंडाच्या कार्यावर कसा परिणाम होतो, त्याची लक्षणे कोणती तसेच तुमचा रक्तदाब आणि मूत्रपिंड या दोघांच्या चांगल्या आरोग्यासाठी काय खबरदारी घ्यावी याविषयी माहिती या लेखाच्या माध्यमातून देण्यात आली आहे. नवी मुंबईतील खारघरचे वरीष्ठ किडनीतज्ञ डॉ अमित नागरीक यांनी उच्च रक्तदाबाने मूत्रपिंडावर होणाऱ्या परिणामांसह काय काळजी घ्यावी?  रक्तदाबामुळे वाढत्या दाबामुळे मूत्रपिंडाच्या रक्तवाहिन्यांचे होणारे नुकसान या सगळ्याविषयी महत्त्वाची माहिती दिलीय.

हायबिपीने किडनीवरील रक्तवाहिन्यांवरचा दाब वाढतो

उच्च रक्तदाबाला "सायलेंट किलर" म्हणून संबोधले जाते. जेव्हा तुमच्या धमन्यांमधून वाहणाऱ्या रक्ताचा दाब खूप जास्त असतो तेव्हा उच्च रक्तदाबाची समस्या उद्भवते. यामुळे हृदयाला अधिक काम करावे लागते आणि शरीरातील रक्तवाहिन्यांवरील ताण वाढतो. उच्च रक्तदाबाची सामान्य कारणे म्हणजे या स्थितीचा कौटुंबिक इतिहास, आहारातील मीठाचे वाढते प्रमाण, शारीरिक हालचालींचा अभाव, लठ्ठपणा, धूम्रपान आणि तणाव. मधुमेह किंवा हार्मोनल विकार देखील उच्च रक्तदाबास कारणीभूत ठरू शकतात. बहुतेक प्रकरणांमध्ये, उच्च रक्तदाबाची चटकन कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. काही लोकांना डोकेदुखी, चक्कर येणे, नाकातून रक्त येणे किंवा अंधुक दृष्टी यासारखी समस्या सतावू शकते, परंतु अनेकांना हे उच्च रक्तदाबामुळे होत असल्याचे माहित नसते. 

कालांतराने, वाढत्या दाबामुळे मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांचे नुकसान होऊ शकते आणि एखाद्याला मूत्रपिंडाच्या समस्या येऊ शकतात. उच्च रक्तदाब हृदयाला हानी पोहोचवू शकतो हे सगळ्यांना माहिती असले तरी, मूत्रपिंडांवर त्याचा गंभीर परिणाम होतो हे फार कमी लोकांना माहिती आहे. रक्तातील कचरा फिल्टर करण्यात मूत्रपिंडांची महत्त्वाची भूमिका असते, परंतु जेव्हा रक्तदाब जास्त काळ उच्च पातळीत राहतो तेव्हा ते मूत्रपिंडाचा आजार किंवा मूत्रपिंड निकामी होण्यास कारणीभूत ठरू शकते.

उच्च रक्तदाब मूत्रपिंडांचे कसे नुकसान करते?

मूत्रपिंडातील रक्तवाहिन्यांना नुकसान: उच्च दाब मूत्रपिंडातील लहान रक्तवाहिन्या अरुंद आणि कमकुवत करू शकतात, ज्यामुळे शरीरातील टाकाऊ पदार्थ फिल्टर करण्याची त्यांची क्षमता कमी होते.

मूत्रपिंडाच्या कार्यात बिघाड : मूत्रपिंड कमी कार्यक्षम होऊ शकतात आणि निकामी होऊ लागतात कारण ते योग्यरित्या कार्य करू शकत नाहीत, ज्यामुळे शरीरात विषारी पदार्थ जमा होऊ शकतात.

क्रॉनिक किडनी डिसीज (CKD): दीर्घकालीन उच्च रक्तदाब हे सीकेडीचे एक प्रमुख कारण आहे आणि जगण्यासाठी डायलिसिस आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणाची आवश्यकता भासू शकते.

मूत्रपिंड निकामी होण्याचा धोका वाढतो: योग्य व्यवस्थापन न केल्यास उच्च रक्तदाबामुळे मूत्रपिंडाचे नुकसान होऊन मूत्रपिंड निकामी होऊ शकते, ज्यामुळे डायलिसिस किंवा प्रत्यारोपणाची आवश्यकता भासते. उच्च रक्तदाबाचा मूत्रपिंडांवर होणारा परिणाम समजून घेणे आणि तज्ञांच्या सल्ल्याचे पालन करून वेळोवेळी तपासणी व योग्य औषधोपचार करणे आवश्यक आहे.

काय काळजी घ्याल?

उच्च रक्तदाबाचे व्यवस्थापन करुन तुमच्या मूत्रपिंडांचे आरोग्य चांगले राखा : तुमचा रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आणि मूत्रपिंडांचे संरक्षण करण्यासाठी, आहारातील मिठाचे सेवन मर्यादित करणे, संतुलित आहाराचे सेवन करणे, नियमित व्यायाम करणे, वजन नियंत्रित राखणे, धूम्रपान टाळणे आणि रक्तदाबाची औषधे घेताना तुमच्या डॉक्टरांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करणे गरजेचे आहे. नियमित तपासणीमुळे रक्तदाबाची समस्या वेळीच ओळखण्यास आणि मूत्रपिंडाचे होणारे नुकसान टाळण्यास मदत होते. हे लक्षात ठेवा की, उच्च रक्तदाब असलेल्यांनी नेहमी सतर्क राहावे आणि पुरेपूर काळजी घ्यावी. नियमित रक्तदाब तपासणी करावी, औषधं घ्यावी आणि तुमच्या मूत्रपिंडांचे रक्षण करावे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरणांत ४५ टीएमसी साठा
पुढील बातमी
महापुरुषांच्या चारित्र्याचे हनन थांबले पाहिजे : डॉ.जयसिंह ओहोळ

संबंधित बातम्या