नवी दिल्ली : पाकिस्तानसोबत कोणतेही संरक्षण सहकार्य न करण्याचे आश्वासन बेल्जियमचे संरक्षणमंत्री थिओ फ्रँकेन यांनी गुरुवारी भारताला दिले. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे २०२५ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट डी वेवर यांनी निषेध केला असून, भारतासोबत संरक्षण सहकार्य वाढवण्याची ग्वाही दिली. सीमापार दहशतवादासह दहशतवादाविरोधातील भारताच्या लढ्याला आपला पाठिंबा व्यक्त केला.
गुरुवारी भारत सरकारने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘दोन्ही नेत्यांनी दहशतवादाचा सामना करण्यासाठी सर्वसमावेशक आणि जागतिक दृष्टिकोनाबाबत आपल्या कटिबद्धतेवर भर दिला. कोणत्याही स्वरूपातील, कोणत्याही रूपातील आणि कुठल्याही ठिकाणच्या दहशतवादाचे कधीही समर्थन केले जाऊ शकत नाही, यावर दोन्ही नेत्यांनी एकमत दर्शवले.’’
दरम्यान, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि बेल्जियमचे संरक्षणमंत्री थिओ फ्रँकेन यांच्यात द्विपक्षीय चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, बैठकीत राजनाथ सिंह यांनी बेल्जियम संरक्षण तंत्रज्ञान किंवा कौशल्य पाकला मिळण्याची शक्यता असल्याबाबत भारताच्या चिंता उपस्थित केल्या.
बेल्जियमच्या पंतप्रधानांना मोदी यांच्याकडून खास भारतीय मेजवानी
बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट दे वेव्हर यांच्या सन्मानार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील हैदराबाद हाऊस मध्ये देशभरातील विविध क्षेत्रातील निवडक मान्यवरांसमवेत गुरुवारी दुपारी अस्सल भारतीय शाकाहारी भोजनाची मेजवानी दिली. ज्येष्ठ सारंगी वादक मोहम्मद आयुब, बासरी वादक हर्षित पाठी आणि अभिजित कलीता यांच्या तबला साथीने यावेळी भारतीय संगीताचा बहारदार कार्यक्रम सादर करण्यात आला.
भारत-बेल्जियम संरक्षण सहकार्याला गती
बेल्जियमचे पंतप्रधान बार्ट वेव्हर यांच्या भारत दौऱ्यादरम्यान दोन्ही देशांनी संरक्षण, व्यापार - गुंतवणूक, ऊर्जा, सुरक्षा आणि संस्थात्मक सहकार्य वाढविण्यासाठी गुरुवारी दहा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर केले. यामध्ये संरक्षण सहकार्याबाबत ‘लेटर ऑफ इंटेंट’, नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रातील सामंजस्य करार तसेच पुढील पाच वर्षांत द्विपक्षीय व्यापार दुप्पट करण्याच्या लक्ष्याचा समावेश आहे.
पाकिस्तानसोबत कोणतेही संरक्षण सहकार्य न करण्याचे बेल्जियमचे संरक्षणमंत्री थिओ फ्रँकेन यांचे भारताला आश्वासन
बेल्जियमच्या पंतप्रधानांना मोदी यांच्याकडून खास भारतीय मेजवानी
by Team Satara Today | published on : 04 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा