सातारा : वारकरी संप्रदायातील मृदंग वादनाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ मृदंगाचार्य मदन कदम यांना यावर्षीचा “संत कृपा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार” जाहीर झाला आहे. त्यांच्या अनेक वर्षांच्या अखंड सेवाभाव, वारकरी संप्रदायाच्या व संस्कृतीच्या जतनासाठी केलेले योगदान तसेच युवकांमध्ये भजन-कीर्तन आणि मृदंग वादनाची आवड निर्माण करण्यासाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे.
मृदंगाचार्य श्री मदन कदम यांनी गेली ४८ वर्षे वारकरी संप्रदायामध्ये मृदंग वादनाचे कार्यक्रम व प्रशिक्षण देत महाराष्ट्रातील असंख्य विद्यार्थ्यांना संगीत व मृदंग वादनाची शिकवण दिली आहे. विविध धार्मिक कार्यक्रम, अखंड हरिनाम सप्ताह, दिंडी सोहळे तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय कार्यक्रमांमध्ये यश संपादन केले आहे. त्यांचे अनेक विद्यार्थी संगीत व मृदंग वादनामध्ये पारंगत असून महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी ते संगीत व मृदंग वादनाचे शिक्षणाचे प्रशिक्षण देत आहेत.
“संत कृपा प्रतिष्ठान”तर्फे देण्यात येणारा हा जीवन गौरव राज्यस्तरीय पुरस्कार धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना प्रदान केला जातो. पुरस्कार वितरण समारंभ लवकरच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
पुरस्कार जाहीर झाल्यानंतर वारकरी संप्रदायातील विविध मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून मृदंगाचार्य मदन कदम यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे सातारा जिल्ह्याच्या वारकरी संप्रदाय व सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.